कोरेगाव-भीमा चौकशी आयोगासमोर 25 ते 28 नोव्हेंबरला साक्षीपुरावे नोंदवणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरेगाव-भीमा चौकशी आयोगाने साक्षीपुरावे नोंदवण्याचे काम चालू ठेवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार साक्ष नोंदवण्याचे काम 25 ते 28नोव्हेंबर या कालावधीत आयोगाच्या मुंबई कार्यालयात होणार आहे आणि त्यानुसार सुरुवातीस ज्या साक्षीदारांची साक्ष घ्यायची आहे त्यांना समन्स काढण्यात आले असल्याचे कोरेगाव-भीमा चौकशी आयोगाच्या सचिवांनी कळविले आहे.

सुनावणीचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध झाला आहे. आयोगाच्या मुंबई आणि पुणे येथील कार्यालयात घेण्यात येणाऱया पुढील सुनावणीचा कार्यक्रम आयोगाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केला जाईल. ज्या साक्षीदारांना साक्षीसाठी बोलावण्यात आले आहे त्यांची नावेसुद्धा माहिती आयोगाच्या कार्यालयात सूचना फलकांवर लावण्यात येणार आहेत.

1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव-भीमा, जि. पुणे येथे घडलेली अनुचित घटना आणि त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेवर झालेला दुष्परिणाम विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने या घटनेची चौकशी, संदर्भ अटीनुसार करण्यासाठी चौकशी आयोगाची स्थापना केली.

11 मे 2018 आणि 15 जून 2018 रोजीच्या जाहीरनाम्याद्वारे शपथपत्राच्या स्वरूपात निवेदने मागवण्यात आली होती. त्यानंतर आयोगासमोर पुरावे नोंदवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान आयोगाचा अहवाल सादर करण्यासाठीची मुदत वेळोवेळी वाढवून देण्यात येऊन वाढीव मुदत 8 नोव्हेंबर 2010 रोजी संपली. दरम्यान गृह विभागाने आयोगास अहवाल सादर करण्याची मुदत 8 फेब्रुवारी 2020 पर्यंत वाढवून दिली आहे.