
सामना प्रतिनिधी । खेड
खेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना अटक करण्यात पोलीस यंत्रणेला आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सोमवारी भरणे नाका येथे मुंबई गोवा महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. भिमसैनिकांनी तब्बल चार तास महामार्ग रोखून धरल्याने गणपती विसर्जन करुन मुंबईकडे निघालेली चाकरमानी महामार्गावर अडकून पडले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या भल्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या.
खेड शहरातील खांबतळे येथील जिजामाता उद्यानात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची 26 मार्च रोजी काही समाजकंटकांनी विटंबना केली होती. 26 मार्चच्या पहाटे ही बाब निदर्शनास आल्यानंतर काही वेळेतच संपुर्ण जिल्ह्यात या घटनेचे पडसाद उमटले होते. ठिकठिकाणी भिमसैनिकांनी निदर्शने केली. खेड शहरात तर मोठय़ा प्रमाणात जनक्षोभ उसळला. परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी पोलिसांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक तात्काळ खेडमध्ये दाखल होत भिमबांधवाना शांत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र संतप्त भिमसैनिक कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समजाकंटकांना शोधण्यासाठी कोल्हापूर येथून श्वानपथक आणण्यात आले होते. सुमारे 2 ते 3 तास या प्रशिक्षित श्वासाने समाजकंटकांचा माग काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दुर्दैवाने समाजकंटकांना माग काढणे शक्य झाले नव्हते.
ज्या कुणी हे कृत्य केले असेल त्यांना लवकरात लवकर गजाआड केले जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांनी दिल्यानंतर प्रक्षुब्ध भिमबांधव काहीसे शांत झाले होते. मात्र या घटनेला काही महिने उलटले तरी समाजकंटकांना पोलिसांनी अटक न झाल्याने भिमसैनिक पुन्हा संतप्त झाले होते. दरम्यानच्या काळात या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता. मात्र सीआयडी तपास पथकाला या प्रकरणात फारसी प्रगती करता आली नव्हती.
पुतळा विटंबना प्रकरणी पोलीस व सीआयडी कुणाला तरी पाठीशी घालत असल्यामुळेच सात महिने उलटले तरी समाजकंटक पोलिसांना सापडत नाहीत असा आरोप करत आरपीआयचे कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आरपीआयच्या वतीने रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला होता. आज सकाळी 10 वाजता जिजामाता उद्यानातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पन करून भिमसैनिकांनी भरणे नाका येथे कुच केली. या ठिकाणी शिवछत्रपतीच्या आश्वारुढ पुतळ्याला मानवंदना देवून भिमसैनिक रस्त्यावर उतरले.



























































