आचारसंहितेचा भंग, भिवंडीच्या माजी महापौरांवर गुन्हा

भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांच्यासह चार जणांविरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी पाटील यांच्या माध्यमातून म्हाडा कॉलनी परिसरात एका रस्त्याचे काम केले जात होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱयांनी तेथे धाव घेऊन पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

म्हाडा कॉलनी भागामध्ये मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी रस्त्याचे काम सुरू करण्यात आली असल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात नागरिकांनी केली. त्यानुसार भरारी पथक क्रमांक 4 मधील बिट निरीक्षक हनुमान म्हात्रे आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तिथे काम करीत असलेल्या इरफान अन्सारी व डंपरचालक जहिरुद्दीन यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी हे काम विलास पाटील यांचे असल्याचे सांगितले.