
भाजपचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी यांची भिवंडीच्या महापौरपदी निवड झाली आहे. शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर नगरसेवक आणि काँग्रेसप्रणीत ‘सेक्युलर फ्रंट’चे उमेदवार नारायण चौधरी यांना 48 मते मिळाली, तर कोणार्क विकास आघाडीचे विलास आर. पाटील यांना 25 मते, भाजपच्या स्नेहा पाटील यांना 16 मते मिळाली.
सत्तेसाठी अनेक पक्ष फोडणाऱ्या भाजपला भिवंडीत मात्र स्वपक्षीय नगरसेवकांनीच दणका दिला. भाजप नगरसेवक नारायण चौधरी यांच्यासह 9 नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन केला. हा गट काँग्रेसच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘सेक्युलर फ्रंट ‘मध्ये सहभागी झाला होता. शुक्रवारी महापौर निवडणुकीसाठी सेक्युलर फ्रंटचे नारायण चौधरी, कोणार्क आघाडीचे विलास पाटील आणि भाजपच्या स्नेहा पाटील यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली.
भिवंडी महापालिका निवडणुकीत 90 पैकी काँग्रेसने सर्वाधिक 30 जागा जिंकल्या. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने 12, भाजपने 22, शिंदे गटाने 12, समाजवादी पार्टीने 6, कोणार्क विकास आघाडीने 4, भिवंडी विकास आघाडीने 3 जागा जिंकल्या. अपक्ष एका ठिकाणी निवडून आला आहे. सत्ता स्थापनेसाठी 46 चा आकडा हवा होता. काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी आणि भाजपचा फुटीर गट यांच्या सेक्युलर फ्रंटच्या नारायण चौधरी यांना एकूण 48 मते मिळाली आणि त्यांची महापौरपदी निवड झाली.


























































