साध्वीची उमेदवारी रद्द झाली ,तर भाजपचा प्लॅन बी तयार

सामना ऑनलाईन। भोपाळ

भोपाळमधून भाजपने उमेदवारी दिलेल्या साध्वी प्रज्ञासिंह शहीद हेमंत करकरे यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आल्या आहेत. बाबरी मशीद पाडण्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. साध्वी यांची उमेदवारी रद्द झाल्यास भाजपने आपला प्लॅन बी तयार ठेवला असून आलोक संजर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

साध्वी प्रज्ञासिंह या मालेगाव बॉम्बस्फोटातल्या प्रमुख आरोपी आहेत. या प्रकरणात तब्येतीच्या कारणांमुळे त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. भाजपने त्यांना भोपाळमधून उमेदवारी जाहीर केल्यानंतर विरोधकांनी साध्वी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करत त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांची उमेदवारी रद्द झाली तर आलोक संजर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात येणार असून डमी उमेदवार म्हणून त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विरोधात एनआयए कोर्टात याचिका

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. त्यामुळे भाजपने भोपाळमधून दिलेले लोकसभेची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी मुंबईतील राष्ट्रीय तपास पथकाच्या (एनआयए) कोर्टात मालेगाव स्फोटातील एका पीडिताच्या वडिलांनी याचिकेद्वारे केली आहे. हा प्रसिद्धीचा स्टंट आहे. त्यामुळे यासंदर्भात राष्ट्रीय तपास पथकाकडे करण्यात आलेला अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे.