
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे एका प्रसिद्ध शाळेच्या विद्यार्थिनीवर शाळेच्या बस चालकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली होती. या बसचालकाच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे.
महसूल विभाग, पोलीस आणि महानगर पालिकेने संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. मंगळवारी हे प्रकरण उघडकीला आलं होतं. गंभीर म्हणजे, या प्रकरणी पीडितेच्या पालकांनी शाळेत तक्रार केली होती. मात्र, शाळेने स्थापन केलेल्या अंतर्गत चौकशी समितीने या चालकाला क्लीन चिट दिली. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी पोलिसात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून या बस चालकाला आणि एका महिला कर्मचाऱ्याला अटक केली आहे.
आरोपी विवाहित असून त्याला दोन मुली आहेत. त्याने तीन महिन्यांपूर्वीच शाळेत काम सुरू केलं होतं. पीडितेने एका ग्रुप फोटोवरून आरोपीची ओळख पटवली. आरोपी चालक हा शाहपुरा परिसरातील वसंत कुंज कॉलनीजवळील टाकीसमोर बागेच्या जमिनीवर बांधलेल्या घरात राहतो. हे घर अवैध असल्याचं महानगर पालिकेचं म्हणणं आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे ही कारवाई करण्यात आली. तोडकाम करण्यापूर्वी चालकाच्या कुटुंबाकडून हे घर रिकामं करण्यात आलं. त्यानंतर बुलडोझरने घर जमीनदोस्त करण्यात आलं.




























































