भोसरी जमीन खरेदी प्रकरण, एकनाथ खडसे यांची ईडीकडून साडेसहा तास चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या एकनाथ खडसे यांची ईडीने चौकशी सुरू केली आहे. पुण्यातील भोसरी जमीन खरेदी प्रकरणात खडसे यांची ईडीच्या अधिकाऱयांनी जवळपास साडेसहा तास चौकशी केली. या चौकशीदरम्यान आपल्यावर कोणताही दबाव टाकण्यात आला नाही. यापुढेही जेव्हा गरज भासेल त्यावेळी चौकशीसाठी हजर राहु, असे खडसे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

भोसरी जमीन खरेदी घोटाळाप्रकरणी ईडीने एकनाथ खडसे यांना नोटीस बजावून 30 डिसेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र कोरोनाच्या लक्षणांमुळे ते चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. शुक्रवारी सकाळी ते मुंबईतल्या ईडी कार्यालयात सकाळी 11 वाजताच दाखल झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत  मुलगी शारदा खडसेही होती. भाजपच्या सत्ताकाळात झालेल्या या वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आतापर्यंत चार वेळा त्यांना या प्रकरणात चौकशीला समोरे जावे लागले आहे.