
मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर आज आणखी एक मालवाहू ट्रक पलटी झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या सहा महिन्यात या एकाच अवघड वळणावर किमान 15 अपघात झाले असल्याने हे वळण वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम करताना वळणाचे काम योग्य पद्धतीने ना झाल्याने या ठिकाणी जीवघेणे अपघात होत असल्याचा आरोप चालक आणि प्रवाश्यांकडून होत आहे.
घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सांगली येथून माल घेऊन निघालेला ट्रक भोस्ते घाट उतरत असताना घाटातील अवघड वळणावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि घाट उतरणारा ट्रक रस्त्यात पलटी झाला. अपघाताची खबर मिळताच खेड येथील मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी पोहचले. दरम्यान खेड पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस आणि मदत ग्रुपच्या सदस्यांनी गंभीर जखमी झालेल्या चालकाला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.
ज्या वळणावर हा अपघात झाला त्या वळणावर गेल्या सहा महिन्यात अनेक अपघात झाले आहेत. अनेक चालक जखमी झालेत मात्र या धोकादायक वळणाबाबत संबंधित ठेकेदार किंवा महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना काहीच पडलेली नाही. रस्त्यावर पडलेले खड्डे वेळेत भरले नाही म्हणून अधिकाऱ्यांना जाब विचारणाऱ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना महिना महिना जेलमध्ये राहावे लागते. मात्र, ज्या ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने वळणाचे काम केले आहे आणि त्यामुळे अनेकांना अपघातांना सामोरे जावे लागते आहे. त्या ठेकेदारावर मात्र कोणतीही कारवाई केली जात नाही, याबाबत काय म्हणावे असे खेदाने नमूद करावेसे वाटते.
ज्या वळणावर वारंवार जीवघेणे अपघात होत आहेत. त्या ठिकाणी किमान स्पीड ब्रेकर टाकायला हवेत, अवघड वळणाची सूचना देणारे फलक लावायला हवेत. मात्र ठेकेदाराने या पैकी काहीही केलेले नाही. पावसात रस्त्यावर पडलेले खड्डे ही बुजवायला ठेकेदाराला वेळ नाही. रस्त्याचा ठेका मिळावा यासाठी जीवतोड प्रयत्न करणाऱ्या ठेकेदाराला रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवायला वेळ नसेल तर त्याने रस्त्याच्या कामाचा ठेका घ्यायचाच का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.



























































