बीएचआर आर्थिक घोटाळा प्रकरण, ठेवीदारांची माहिती मिळविण्यासाठी पोलिसांकडून सीआयडीला पत्रव्यवहार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या (बीएचआर) गुन्ह्याच्या तपासासाठी ‘सीआयडी’कडे असणारी ठेवीदारांची माहिती प्राप्त करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. ठेवीदारांची माहिती मिळाल्यास प्रकरणाचा सखोल तपास करण्यास पोलिसांना मदत होणार आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने यापूर्वीच बीएचआर संदर्भात आर्थिक गैरव्यवहार उजेडात आणला आहे.

पुणे पोलिसांकडून ‘बीएचआर’च्या अवसायक व पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्याने केलेल्या गैरव्यवहाराचा तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव येथे छापे टाकून मोठ्या प्रमाणात पुरावे जप्त केले होते. याप्रकरणी सनदी लेखाधिकारी धरम किशोर सांकला (वय 40), महावीर माणिकचंद जैन (वय 37), ठेवीदार संघटनेचा अध्यक्ष विवेक देविदास ठाकरे (वय 45), सुजित सुभाष बाविस्कर (वय 42) कमलाकर भिकाजी कोळी (वय 28, सर्व रा. जळगाव) यांना अटक केली होती.

आर्थिक गुन्हे शाखेकडून प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. तपासाला गती मिळण्यासाठी सीआयडीसोबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. ‘सीआयडी’कडून मिळणाऱ्या माहितीमुळे ठेवीदारांची एकूण संख्या, त्यांची किती रक्कम आहे, किती ठेवी थकीत आहेत, अशा स्वरूपाची माहिती मिळणार आहे. त्याचा उपयोग आर्थिक गुन्हे शाखेला होणार आहे.

या प्रकरणाचा तपास आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. दरम्यान, भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील गैरव्यवहारासंबंधी ‘सीआयडी’ने त्यांच्याकडे दाखल असलेल्या 73 गुन्ह्यांचा तपास करून त्याबाबतचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केलेले आहे. ‘सीआयडी’ने सर्वात आधी ‘बीएचआर’मधील गैरव्यवहार पुढे आणला होता.