सिडको भूखंड व्यवहारात पाणी मुरतंय-छगन भुजबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना पतिनिधी, नागपूर

नवी मुंबईतील वादग्रस्त सिडको भूखंड व्यवहारात कुठेतरी पाणी मुरते आहे हे मुख्यमंत्र्यांनाही पटले असावे. म्हणूनच त्यांनी न्यायालयीन चौकशी होईपर्यंत भूखंड व्यवहाराला स्थगिती दिली, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी रविवारी नागपूर आगमनानंतर माध्यमांशी बोलताना केले. राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे रविवारी सायंकाळी ५.३० वाजता नागपुरात आगमन झाले. सोमवारी ते विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होतील. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच उपराजधानीत आलेल्या भुजबळ समर्थकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या गराडय़ातच भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला. ते फुले पगडी घालून आले होते.

सिडको भूखंड व्यवहारप्रकरणी विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी योग्य उत्तरे द्यायला हवी होती, पण त्यांनी नेहमीच्या शैलीने आधी आरोप फेटाळून लावले आणि नंतर स्थगिती दिली. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे काम अडचणीचे झाले आहे, असे ते म्हणाले.