भुसावळात वाढीव दराने मास्कची विक्री, शिवसेनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

कोरोना संसर्गाच्या भीतीने भुसावळ शहरात मास्कची खरेदी वाढली आहे. मात्र शहरातील काही मेडिकल स्टोअर्सचालक नियमबाह्य पद्धतीने एमआरपीपेक्षा वाढीव रक्कम आकारून मास्कची विक्री करीत आहेत. या प्रकरणी कारवाईची मागणी शिवसेनेचे शहराध्यक्ष नीलेश महाजन यांनी मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्याकडे केली आहे.

देशभरात मास्कची विक्री वाढली आहे. मात्र भुसावळ शहरात या मास्कची विक्री एमआरपीपेक्षा अधिक दराने होत आहे. या प्रकरणी पालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने चौकशी करून प्रतिबंध घालावा. वाढीव किमतीमुळे तसेच ब्लॅकने मास्क विक्री होत असल्याने सर्वसामान्यांना मास्क मिळत नसल्याची स्थिती आहे. या प्रकरणी मुख्याधिकारी करुणा डहाळे यांची भेट घेऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले. याबाबत पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी डहाळे यांनी दिले. पालिका प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अन्यथा शिवसेनेला आपल्या शैलीत आंदोलन करावे लागेल, असा इशारा शिवसेनेचे शहराध्यक्ष नीलेश महाजन, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख पूनम बऱहाटे, शहरप्रमुख प्रतिभा दुसाने, कल्पना बुंदेले, प्रसिद्धी प्रमुख गोपुळ बाविस्कर, नामदेव बऱहाटे आदींनी दिला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने आता भुसावळ शहरात जनजागृतीवर विशेष भर दिला आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे, असा सल्ला पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कीर्ती फलटणकर यांनी दिला आहे. भुसावळ शहरात जनजागृतीसाठी रिक्षा व ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना आवाहन केले जाणार आहे. पुढील सूचना येईपर्यंत शहरात अधिक गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्दी, ताप, खोकला आदींच्या रुग्णांनी तत्काळ वैद्यकीय उपचार घ्यावेत, असा सल्लाही आरोग्य विभागाने दिला आहे. सर्दी, ताप, डोकेदुखी, खोकला, घसा खवखवणे, अस्वस्थ वाटणे, शिंका येणे, धाप लागणे, अशी लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांनी तातडीने उपचार करून घ्यावे, असा सल्लाही देण्यात आला आहे.

शिक्षणोत्सव कार्यक्रमाला स्थगिती
जळगाव – भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने 14 मार्चला तालुकास्तरावरील एकदिवसीय शिक्षणोत्सव उपक्रमाचे आयोजन केले होते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम स्थगित केले आहे. यासंदर्भात जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व प्राथमिक शिक्षणाधिकाऱयांनी पत्राद्वारे माहिती कळवली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा कार्यक्रम स्थगित केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या