
दार उघडणार, नशिबाचा खेळ पालटणार; अशी टॅगलाईन घेत यंदाचा बिग बॉस मराठीचा सहावा सिझन 11 जानेवारी 2026 म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. आठशे खिडक्या नऊशे दार आणि प्रत्येक दाराच्या मागे लपलंय एक रहस्य… दारातून लागू शकतो चकवा अशा थीमने यंदाचे बिग बॉस मराठीचे घर सजवण्यात आले आहे.

यंदाच्या सिझन हा इतर सिझनपेक्षा वेगळा असणार असल्याचे बिग बॉसच्या हटके घरावरूनच दिसून येत आहे. हे घर तीन भागांमध्ये विभागले असून तिघांनाही एक वेगळा लूक दिलेला आहे. गार्डन एरियाला एखाद्या प्राणीसंग्रहालयासारखा लूक आहे. भिंतीवर बिबटे, वाघ यांची चित्र पाहायला मिळत आहे. सोफा खुर्च्या यांना फ्लोरल थीम दिली आहे. बाल्कनी एरियाला ट्री हाऊस सारखा लूक दिला आहे.

तर लिव्हिंग एरिया हा एखाद्या परदेशातील घरांसारखा रंगीबिरेंगी लूक देण्यात आला आहे. त्यामुळे त्याला एक इंटरनॅशन टच मिळाला आहे. या लिव्हिंग एरियामध्ये एक अतिशय सुंदर अशी फ्लोरल रुम बनवण्यात आली आहे.

बेडरुमला देखील इंटरनॅशन टच असून यात यंदा बंक बेडचा ट्विस्ट देण्यात आला आहे. एकावर एक असे हॉस्टेलमध्ये असणारे या बेडवर झोपण्यावरून स्पर्धकांमध्ये वाद होताना दिसणार आहेत.

मराठमोळा टच दिसला नाही
बिग बॉस मराठी सुरू झाले तेव्हापासून प्रत्येक सिझनला एक मराठमोळा टच देण्यात आलेला. लिंबू मिरची, नथ, पैठणी अशा वेगवेगळ्या थीम वापरून घर सजवण्यात आले होते. मात्र यंदा बिग बॉसचे आर्ट डायरेक्टर उमंग कुमार यांनी मराठमोळा टच देण्याऐवजी घराला इंटरनॅशनल लूक देण्यावर भर दिला आहे. ”आपण कलाकार मराठी आणणार आहोत. आपल्या मनात मराठी आहेच, स्पर्धक मराठीत बोलणार आहेत. त्यामुळे मराठी यात कुठेही लपली गेलेली नाही. फक्त यंदा एक पाऊल पुढे जात आपण त्याला थोडा हटके लूक दिला आहे. तसेच बिग बॉसच्या चकवा लागणार या थीमसाठी टाळे चावी, दारे खिडक्या अशा डिझाईन्सने घर सजवले आहे”, असे उमंग कुमार यांनी सांगितले.

































































