आरोग्य प्रशिक्षणाच्या नावाखाली लहान मुलीला देहव्यापारात ओढले, पुढे जे घडले ते भयंकर होते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

बिहारमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आशा सेविका आरोग्य प्रशिक्षण देत असल्याचे सांगत अल्पवयीन मुलींना गावाच्या बाहेर बोलवून त्यांच्याकडून बळजबरीने देहव्यापार करवून घेत असल्याची भयंकर घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर हे प्रकरण उघड झाले असून याप्रकरणी आशा सेविकेला पोलिसांनी अटक केली आहे.

ही आशा सेविका गावातील लहान मुलींना आरोग्य प्रशिक्षण देण्यासाठी गावाच्या बाहेर घेऊन जायची. या सेविकेवर विश्वास ठेवून पालक त्यांच्या मुलींना आशा सेविकेसोबत पाठवायचे. मात्र गावाबाहेर गेल्यानंतर ही सेविका निरागस मुलींना बळजबरीने देहव्यापार करण्यास भाग पाडायची. गावातील एका सोळा वर्षाच्या मुलीसोबत तिने हाच प्रकार केला होता. या प्रकाराबाबत घरी सांगितलंस तर परिणाम वाईट होतील अशी धमकी या आशा सेविकेने दिली होती. घाबरलेल्या मुलीने घरी याबाबत एक शब्दही काढला नाही. मात्र काही दिवसाने मुलीच्या आईला काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले. तिने मुलीला विश्वासात घेऊन सगळा प्रकार विचारला. यानंतर मुलीने जे काही सांगितले त्यामुळे तिच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. आपली सोळा वर्षांची मुलगी गरोदर असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. या मुलीने पुढे जे काही आईला सांगितले त्यामुळे तिची आई जबरदस्त हादरली आहे.

मुलीने सांगितली की, हे सगळं गावातील आशा सेविकेने केले असून बळजबरीने तिने देह व्यापार करण्यास भाग पाडले. एवढेच नाही तर त्या आशा सेविकेने त्या मुलीला गर्भपात करण्यासाठी गोळ्याही दिल्या होत्या. मुलीसोबत झालेल्या या प्रकाराने हादरलेल्या कुटुंबियांनी रफीगंज पोलिस स्थानकात याबाबत तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.