बिहारमधील ‘सुशासन’

कोरोनाच्या भयंकर महामारीत भाजपचे नेते राजकारण करण्यात गर्क आहेत. देशात जिथे जिथे भाजपच्या विरोधातील पक्षांची सरकारे आहेत त्या सरकारांना कोरोना काळातही काम न करू देता ट्रोल करण्याचे उद्योग भाजपच्या मंडळींकडून होत असते. तिकडे बिहारचे मुख्य सचिव अरुणकुमार सिंग यांनाही वेळेत बेड न मिळाल्याने व पुरेशा आरोग्यसुविधा न मिळाल्याने मृत्यूला सामोरे जावे लागल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. त्यामागची नितीशबाबू सरकारची सुस्ताई अधिक चीड आणणारी आहे. कोणत्याही राज्याचे मुख्य सचिव हे त्या राज्यातील प्रशासनाचे प्रमुख असतात.

कोरोनाची लागण झाल्यानंतर अरुणकुमार सिंग यांनी पाटण्यातील मेडिकल कॉलेजसह अनेक सरकारी दवाखान्यांत बेड मिळतो का, यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र त्यांना बेड उपलब्ध झाला नाही. शेवटी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. दरम्यानच्या काळात, मुख्य सचिवांनी राज्याचे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांना ‘मला बेड उपलब्ध करून द्या, माझा जीव वाचवा’, अशी आर्त विनंती केली. मात्र ही विनंती गांभीर्याने घेतली गेली नाही. त्यामुळे एका वरिष्ठ अधिकाऱयाला उपचाराअभावी प्राणाला मुकावे लागले.

एरव्ही नितीशबाबू अनेक निवडणुकांमधून स्वतःची ‘सुशासनबाबू’ म्हणून आरती ओवाळून घेत असतात. पण त्यांच्या राज्यात जर मुख्य सचिवांसारख्या राज्याच्या प्रमुख व्यक्तीलाच उपचार मिळत नसतील तर नितीशकुमारांना सुशानसबाबू म्हणून घेण्याचा नैतिक वगैरे अधिकार उरतो का? ही राज्ये भाजपच्या अखत्यारितील असल्याने भक्तमंडळी काही बोलणारच नाहीत. आमदार आणि मुख्य सचिवांसारख्यांना पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नसतील तर सामान्य माणसांचे आयुष्य किती खडतर असेल याची नुसती कल्पनाच केलेली बरी!

आपली प्रतिक्रिया द्या