बिहार विधानसभा निवडणूक – भीक मागून रिंगणात उतरणार ‘हा’ उमेदवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

एखाद्या निवडणुकीत उमेदवारी घोषित झाल्यावर मोठ्या दिमाखात शक्तीप्रदर्शन करत समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येतो. तर काहीजण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करतात. त्यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात येते. तसेच निवडणूक प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात पैसाही खर्च करण्यात येतो. मात्र, बिहारच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या एकजण चक्क भीक मागून निवडणूक रिंगणात उतरत आहे. आपल्या क्षेत्रातील गरिबांच्या समस्या आपल्याला सरकारपर्यंत पोहचवायच्या आहेत, असे या उमेदवाराने सांगितले.

जमुईमधील झाझा विधानसभा क्षेत्रात प्लुरल्स पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करायला आलेल्या उमेदवाराला पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. या उमेदवारासोबत शक्तीप्रदर्शन करण्यासाठी समर्थक नव्हते किंवा रुबाब दाखवण्यासाठी हा उमेदवार कोणत्याही महागड्या गाडीतून आला नव्हता. तर उमेदवारी अर्जासाठी पैसे कमी पडत असल्याने त्याने भीक मागून पैसे जमवले होते. सूर्या वत्स असे या उमेदवाराचे नाव असून आपण भीक मागून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. झब्बा, धोतर, खांद्यावर घेतलेला पंचा आणि पायात हवाई चप्पल अशी त्यांची राहणी आहे. निवडणूक अर्ज भरण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने भीक मागून पैसे जमवले. जनतेच्या समस्या सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी आपण निवडणूक लढवत आहोत. तसेच जनतेकडून भीक मागून निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले.

सूर्या वत्स समाजसेवक आहेत. ते वर्षभर फक्त दोनच कपडे वापरतात. थंडीच्या दिवसात भीक मागून जमलेल्या पैशांतून निराधारांना ब्लँकेटचे वाटप करतात.आपल्या विधानसभा क्षेत्रात गरीबीची बिकट समस्या आहे. या जनतेच्या अनेक समस्या आहेत. यासाठी कोणकडे आणि कशी दाद मागायची असा प्रश्न यांना पडला आहे. त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय आपण घेतला आहे. उमेदवार घरोघरी जाऊन पत्रक वाटत प्रचार करतात. आपण मात्र, घरोघरी जात भीक मागून निवडणूक लढवणार आहोत, असे त्यांनी सांगितले. अशा प्रकारे निवडणूक लढवणार उमेदवार पाहून सगळ्यानांच आश्चर्य वाटत आहे.