भाजपचा ‘बिहार बंद’ अपयशी, एकाही व्यक्तीचा पाठिंबा मिळाला नाही; तेजस्वी यादव यांचा दावा

भाजपचा बिहार बंद अपयशी ठरला असून याला एकाही व्यक्तीचा पाठिंबा मिळाला नाही, असा दावा राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. आज भाजपने बिहार बंद पुकारला होता. यावरच आपली प्रतिक्रिया देताना ते असं म्हणाले आहेत.

माध्यम प्रतिनिधींशी बोलताना तेजस्वी यादव म्हणाले की, “भाजप आणि एनडीएने पुकारलेला बिहार बंद खूपच फ्लॉप होता. भाजप आणि एनडीएला एकाही सामान्य माणसाचा पाठिंबा मिळाला नाही, उलट भाजपच्या लोकांनी रस्त्यावर गुंडगिरी केली. महिला आणि शिक्षकांशी गैरवर्तन करण्यात आले, रुग्णवाहिका थांबवण्यात आल्या, इतकेच नाही तर सामान्य नागरिकांना जबरदस्तीने त्रास देण्यात आला.”

ते म्हणाले, “हे सर्व चित्र आज बिहार बंदमध्ये दिसले, म्हणजेच पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या बंदला आणि भाजपच्या लोकांना बिहारच्या एकाही नागरिकाचा पाठिंबा मिळाला नाही.”