
आजकाल लोक मला विचारतात – तुमच्या चेहऱयावर आनंद दिसतोय, याचं गुपीत काय? खरं सांगतोय, भाजपमुक्त झालोय म्हणून मी खूश असतो, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बेधडकपणे सांगितले. 2017 मध्ये भाजपसोबत जाण्याचा निर्णय मूर्खपणाचा होता. मात्र, भविष्यात भाजपशी कोणतीही युती करणार नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले.
जदयूची राष्ट्रीय परिषदेची बैठक पाटणा येथे झाली. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढविला. 2024 साठी विरोधकांची एकजूट हवीय, असा पुनरुच्चार केला.
दिल्लीत गाठीभेठी
मुख्यमंत्री नितीश कुमार आज सायंकाळी दिल्लीत पोहोचले. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. पंतप्रधान बनण्याची माझी इच्छा नाही आणि महत्त्वाकांक्षा नाही. 2024 साठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे नितीश कुमार यांनी सांगितले. बुधवारपर्यंत (दि. 7) नितीश कुमार दिल्लीत आहेत. या काळात ते विविध विरोधीपक्षांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.
काय म्हणाले नितीश कुमार
2013 मध्ये भाजपपासून आम्ही फारकत घेतली हे खूप चांगले झाले होते. मात्र, 2017 मध्ये जे जदयू तोडत होते त्यांच्याबरोबर पुन्हा आम्ही गेलो. भाजपसोबत गेलो ही चूक होती. तो मूर्खपणा होता. भाजपसोबत गेल्याने इतर राज्यांतील लोक माझ्यापासून दूर गेले. यापुढे अशी चूक करणार नाही.
जे लोक देश बर्बाद करण्याचा प्रयत्न करत आहेत, कायमस्वरूपी देशावर कब्जा मिळविण्याचा ज्यांचा इरादा आहे, त्यांच्यापासून मुक्ती पाहिजे. त्यासाठी विरोधी पक्षांची एकजूट आवश्यकच आहे. विरोधक एकत्र आल्यास त्यांचा (भाजप) पराभव होईल.



























































