उमेदवारी अर्जाचा आज शेवटचा दिवस, बिहारमध्ये काँग्रेस-आरजेडीमध्ये 10 जागांवर मैत्रीपूर्ण लढत?

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस असतानाही काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलामध्ये 10 जागांवरून पेच निर्माण झाला आहे. या दहा जागांवर दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. दोन्ही पक्षांमधील चर्चाही बंद झाल्याने या जागांवर मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आरजेडीने सुरुवातीला काँग्रेसला 52 जागा देऊ केल्या होत्या, मात्र काँग्रेसने 60 जागांचा आग्रह धरला. तो आरजेडीने फेटाळला. त्यानंतर राज्यस्तरीय नेत्यांमधील चर्चाच थांबली आणि हा प्रश्न राष्ट्रीय नेत्यांकडे गेला. त्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लालूप्रसाद यादव यांना फोन केला. त्यानंतर आरजेडीने काँग्रेसला 61 जागा देण्याची तयारी दाखवली, मात्र दहा मतदारसंघांवरील दावा सोडण्यास ठाम नकार दर्शवला. तो पेच आजही कायम आहे. यावर उद्यापर्यंत निर्णय न झाल्यास मैत्रीपूर्ण लढतीचा मार्ग काढला जाईल, असे बोलले जात आहे.