Bihar election 2025 – कपडे फाडले, ढसाढसा रडले, जमिनीवर लोळले; तिकीट नाकारले म्हणून RJD नेत्याचा लालूंच्या घराबाहेर धिंगाणा

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सर्वच पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. राष्ट्रीय जनता दलानेही विधानसभेसाठी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये नाव नसल्याने अनेक इच्छुकांना धक्का बसला असून यापैकीच एक मदन शहा यांनी थेट लालू प्रसाद यांचे घर गाठत तिथे धिंगाणा घातला.

मदन शहा हे मधुबन विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी करत होते. तिकीट मिळणार याची शास्वती त्यांना होती. मात्र उमेदवारांची यादी जाहीर झाल्यावर त्यांना धक्का बसला. त्यामुळे त्यांनी थेट राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे 10, सर्क्यूलर रोडवरील घर गाठले आणि धिंगाणा घातला. मदन शहा यांनी गेटसमोरच कुर्ता फाडला आणि जमिनीवर लोळून ढसाढसा रडू लागले. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राजदमध्ये पैसे घेऊन तिकीट वाटले जात आहे. पैसे देण्यास नकार दिल्यावर मधुबन मतदारसंघातून डॉ. संतोष कुशवाहा यांना तिकीट देण्यात आले, असा आरोप मदन शहा यांनी माध्यमांशी बोलताना केला.

1990 पासून मी पक्षामध्ये कार्यरत आहे. पक्षासाठी मी तळागाळात काम गेले, जमीनही विकली. पण आता पैसे घेऊन तिकीट वाटले जात आहे. पक्षासाठी जीव तोडून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून श्रीमंतांना प्राधान्य दिले जात आहे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी राजदचे राज्यसभा खासदार संजय यादव यांच्यावर पैसे घेऊन तिकीट विकल्याचा आरोप केला.

दरम्यान, मदन शहा यांनी घातलेल्या धिंगाण्यामुळे लालू प्रसाद यादव यांच्या घराबाहेर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घराबाहेरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मदन शहा यांना तात्काळ परिसरातून बाहेर काढले. यावेळी मदन शहा यांनी लालूंच्या गाडीचाही पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.