
अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम करण्यात आले. महाराष्ट्राची बदनामी करणारे पोलीस अधिकारी गुप्तेश्वर पांडे राजकारणात येऊन बिहारमध्ये निवडणूक लढवत आहेत. त्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला देवेंद्र फडणवीस जाणार का? असा सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
एम्सचा रिपोर्ट जाहीर झाला आहे. कूपर आणि एम्सचा रिपोर्ट पाहिला तर त्यात पुठेही व्हिसेरामध्ये विषाचा अंश सापडला नाही. या संपूर्ण केसची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून सुरू आहे. सीबीआयच्या अंतिम रिपोर्टची सर्वजण वाट पाहत आहेत. सीबीआयने लवकरात लवकर रिपोर्ट जाहीर करावा अशी आमची विनंती असल्याचे अनिल देशमुख मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाविरोधात युद्ध लढत असताना महाराष्ट्राविरोधात षडयंत्र रचण्यात आले. महाराष्ट्राला बदनाम करण्यात आले. त्याच्याही पुढे जाऊन जे बाहेरचे आहेत, पण महाराष्ट्रात वास्तव्य करत आहेत अशा बाहुलीलाही आपल्या तालावर नाचवण्याचे काम या पक्षाने केले. महाराष्ट्र पोलिसांना माफिया म्हणण्यापर्यंत भाजपच्या नेत्यांची मजल गेली होती, अशी टीका देशमुख यांनी केली.
सुशांत मृत्यू प्रकरणावर अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाने एक रिपोर्ट तयार केला. या रिपोर्टमध्ये हे प्रकरण एका राजकीय पक्षाने वेगळ्या दिशेने नेले असून प्रसारमाध्यमांकडून मोठे करण्यात आल्याचे म्हटले असल्याचे अनिल देशमुख यांनी निदर्शनास आणून दिले.
महाराष्ट्राला बदनाम करणाऱयांनी माफी मागावी
राज्याचे पाच वर्षे नेतृत्व करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला. ज्या पद्धतीने महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम काही पक्षांमार्फत झाले, मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे काम झाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करणाऱया लोकांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अन्यथा महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही असे देशमुख म्हणाले.





























































