तिहेरी मजाक! एकाच अधिकाऱ्याने एकाच वेळी केली तीन विभागात 30 वर्ष नोकरी

2711

सरकारी विभागांच्या तीन वेगवेगळ्या कार्यालयात एकाच कर्मचाऱ्याने गेली 30 वर्षं एकाच वेळी नोकरी केल्याची खळबळजनक बाब उघडकीला आली आहे. विशेष म्हणजे, यातील दोन विभागांमध्ये त्याला बढती मिळाल्याचंही उघड झालं आहे. बिहार इथल्या राज्य रस्तेबांधणी विभागात काम करणाऱ्या सुरेश राम या कनिष्ठ अभियंत्याविरोधात या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणानंतर सरकारी नोकऱ्यांमधला अनागोंदी कारभारही उघड झाला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सुरेश राम याचा सहकारी मधुसूदन कुमार कर्ण यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 20 फेब्रुवारी 1988रोजी सुरेश याची नियुक्ती राज्य रस्तेबांधणी विभागात कनिष्ठ अभियंता पदावर झाली. त्याच्या पुढील वर्षी म्हणजे 28 जुलै 1989 रोजी सुरेश याला जलस्रोत विभागाकडूनही नोकरीबाबत विचारणा झाली. कनिष्ठ अभियंता पदाचा राजीनामा न देता सुरेश जलस्रोत विभागात कर्मचारी म्हणून रुजू झाला. त्यानंतर जलस्रोत विभागातील अजून एक नोकरी त्याला मिळाली आणि तो अन्य दोन नोकऱ्यांसह तिथेही रुजू झाला. गंमत म्हणजे रस्ते विभागात त्याला 10 एप्रिल 2018 रोजी बढतीही मिळाली. तसंच त्याला 2005मध्ये जलस्रोत विभागातही बढती मिळाली होती.

हा सगळा प्रकार कोणाच्याही लक्षात न येता थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 30 वर्षं सुरू होता. पण, आर्थिक यंत्रणेत दाखल झालेल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह फायनान्शिअल मॅनेजमेंट सिस्टिम (सीएफएमएस) ने त्याचं पितळ उघडं पाडलं. या नव्या यंत्रणेनुसार प्रत्येक कर्मचाऱ्याचे आधार कार्ड, जन्मतारीख, पॅन कार्ड हे तपशील जोडणं अनिवार्य आहे. सुरेश यानेही आपले तपशील जमा केले आणि या घोटाळ्याचा सुगावा लागला. एकच कर्मचारी गेली 30 वर्षं तीन वेगवेगळ्या विभागांमध्ये एकाच वेळी काम करत होता, त्यासाठी संबंधित विभागांकडून पगार आणि बढतीही मिळवली. कर्ण यांच्या तक्रारीनंतर आता सुरेश यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. या प्रकरणानंतर आता बिहार राज्य सरकारच्या इतर विभागांमध्येही असे प्रकार घडलेले असू शकतात, याबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या