काँग्रेस, आरजेडी देशाला पुन्हा अंधारात ढकलतील- मोदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। बक्सर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील प्रचारसभेत मंगळवारी विरोधकांवर जोरदार हल्ला केला. काँग्रेस अनेक वर्षे सत्तेत राहिली, परंतु दहशतवाद्यांसमोर नेहमीच गुडघे टेकले. पाकिस्तानला त्यांना उत्तर देता आले नाही. त्यामुळे जनतेनेही त्यांना कान पकडून आता बस झाले असे सांगितले, अशी टीका मोदी यांनी केली. यावेळी त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलवरही तोफ डागली. बिहारला आम्ही अंधःकारातून एलईडीच्या युगात आणले, पण काँग्रेस आणि आरजेडी पुन्हा सत्तेत आले तर देशाला पुन्हा अंधःकारात ढकलतील, असा टोलाही मोदी यांनी यावेळी लगावला.

त्यांचा अहंकार सातव्या स्थानावर
काँग्रेसचा अहंकार सातव्या स्थानावर गेला आहे. त्यांचा हाच अहंकार आणीबाणीप्रसंगीही दिसला. जेव्हा संपूर्ण देशाला त्यांनी संकटात टाकले होते. त्यावेळी जयप्रकाश नारायणसारख्या महान व्यक्तीने त्यांची मस्ती उतरवली होती. या काँग्रेसने देशातून ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नावही मिटवण्याचा प्रयत्न केला होता. हा त्यांचा अहंकारच होता. बाबासाहेबांचे वारसदार असल्याचा दावा करणारे आज खुलेआम काँग्रेसचा झेंडा घेऊन फिरत असल्याची टीकाही मोदी यांनी यावेळी विरोधकांवर केली.

शेतकऱयांची फसवणूक केली
विरोधकांनी शेतकऱयांच्या केवळ बाता केल्या. त्यांना खोटी आश्वासने दिली, पण त्यांच्या शेतात पाणी पोहोचले नाही. दुर्गावती जलयुक्त शिवार योजनेचे त्यांनी काय केले हे तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे काँग्रेसने शेतकऱयांची नेहमी फसवणूकच केली हेच उघड झाल्याच्या शब्दांत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

ते महामिलावटी गरीबांना लुटत आहेत
ते महामिलावटी लोक केवळ समाजात फूट पाडण्याचेच राजकारण करत असून त्यांनी गरीबांना लुटले आहे. मी मोठय़ा कालावधीसाठी गुजरातचा पंतप्रधान राहिलो. जनतेच्या आशीर्वादामुळे पाच वर्षे पंतप्रधान राहिलो, पण माझ्या आणि त्यांच्या संपत्तीची तुलना करून बघा, असेही मोदी म्हणाले.

सर्जिकल स्ट्राइकबाबत मोदी म्हणाले की, जेव्हा आमचे जवान सर्जिकल स्ट्राइक करतात, एअर स्ट्राइक करतात तेव्हा विरोधक पुरावे मागतात असेच यांचे विचार आहेत. त्यामुळेच त्यांच्याबद्दल जनतेत प्रचंड असंतोष असून आता बस झाले असे जनता म्हणत आहे. विरोधक देश तोडणाऱयांबरोबर असल्याचा आरोपही मोदी यांनी यावेळी केला.