खुर्ची वाचवा! हकालपट्टीनंतर प्रशांत किशोर यांचा नितीश कुमारांना खणखणीत इशारा

1654

बिहारची विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच जदयूमध्ये घमासान सुरू आहे. बुधवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर आणि पवन वर्मा यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना पक्षातून बाहेर काढले. या कारवाईनंतर प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांना खणखणीत इशारा देत आता तुम्ही फक्त ‘खुर्ची वाचवा’ असे म्हटले.

बिहारमध्ये राजकीय भूकंप! प्रशांत किशोर यांची ‘जदयू’मधून हकालपट्टी

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी मोठा निर्णय घेतला. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मतभेद झाल्याने प्रशांत किशोर आणि पवन वर्मा यांची जदयूमधून हकालपट्टी करण्यात आली. हकालपट्टीनंतर ट्वीट करत प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांना उपरोधिक टोला लगावला आहे. ‘तुम्ही बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचवा. तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा. इश्वर तुमचे भले करो’, असे ट्वीट प्रशांत किशोर यांनी केले.

नक्की काय आहे प्रकरण?
लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बिहारमधील सत्ताधारी पक्ष जदयूने नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थन करत त्याच्या बाजून मतदान केले होते. यानंतर प्रशांत किशोर यांनी पक्षविरोधी भूमिका घेत या कायद्याला विरोध केला. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुशील मोदी आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये ट्वीटवॉरही रंगली.

तसेच नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व जदयूचे नेते प्रशांत किशोर यांच्यात बिनसले होते. प्रशांत किशोर यांनी मंगळवारी नितीश कुमार यांना फटकारत त्यांचा खोटारडे असा उल्लेख केला. त्यामुळे दोघांमध्ये तणाव वाढला होता. अखेर बुधवारी प्रशांत किशोर आणि पवन वर्मा यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या