आम्ही भाजपचे गुलाम नाही! बिहारमध्ये ‘एनडीए’चा इस्कोट होण्याच्या मार्गावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पाटणा

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनत दलाशी ‘जागावाटप’ करून निश्चित झालेल्या भाजपला ‘राष्ट्रीय लोक समता पार्टी’ (आरएलएसपी) या घटकपक्षाने आज जबरदस्त दणका दिला. आमच्या पक्षाला ‘जदयू’पेक्षा अधिक जागा मिळाल्याच पाहिजेत, अशी मागणी करतानाच ‘‘आम्ही काही भाजपचे गुलाम नाही’’ असे ‘आरएलएसपी’चे कार्याध्यक्ष नागमणी यांनी ठणकावले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

नितीश कुमार यांच्या ‘जदयू’ला दीड ते दोन टक्केच मते मिळाली आहेत, पण आमच्या पक्षाला 10 टक्के मते मिळाली आहेत असे सांगून ते म्हणाले की, बिहरात ‘आरएलएसपी’ पक्षाचा जनाधार मोठा आहे. कोणी आम्हाला कमी लेखू नये. ‘आरएलएसपी’ला वाटेल तशी वागणूक दिली तर काही बिघडणार नाही या भ्रमात भाजपने राहू नये.

‘आरएलएसपी’ला ‘एनडीए’तून बाहेर काढणार?

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि ‘आरएलएसपी’चे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांच्यातील राजकीय हाडवैर बिहारमध्ये सर्वश्रुत आहे. त्यातच कुशवाह यांच्यासाठी भाजप नितीश कुमार यांना गमावू शकत नाही. अशा परिस्थितीत बिहारमधील 40 जागांचे वाटप हे भाजप 20, जदयू 15 आणि लोकजनशक्ती पार्टी 5 असेच राहील, असे जदयूच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

लालूंच्या ‘राजद’शी संधान

‘आरएलएसपी’चे पक्षाध्यक्ष, केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह हे लालूप्रसाद यादव यांच्या ‘महाआघाडी’च्या संपर्कात आहेत. गरज पडली तर आमचा पक्ष त्या महाआघाडीत सामील होऊ शकतो, असेही नागमणी यांनी सांगून टाकले आहे. लोकसभा निवडणुकीतील जागावाटपातून भाजपने ‘आएलएसपी’ला दुर्लक्षित केल्याचे दिसत असल्याने हा पक्ष आक्रमक झाला आहे.