
बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणीच्या (SIR) मुद्द्यावरून लोकसभेत विरोधकांचा आज जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणीवर चर्चा व्हावी, अशी मागणी आज लोकसभेत इंडिया आघाडीतील पक्षांनी केली होती. यानंतर सभापतींनी लोकसभेचे कामकाज बुधवार, 23 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्याची घोषणा केली. महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मतांच्या चोरीचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. याच संदर्भात आता निवडणूक आयोगाने मोठी अपडेट दिली आहे.
बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणी प्रक्रियेनंतर राज्यभरातील मतदार यादीतून 51 लाख मतदारांची नावे वगळण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यात 18 लाख मतदार मृत आढळले आहेत आणि 26 लाख कायमचे स्थलांतरित झाले आहेत, सुमारे 7.5 लाख मतदार अनेक ठिकाणी नोंदणीकृत आढळले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, मतदार याद्यांच्या फेरतपासणीदरम्यान, 18 लाख मतदार मृत आढळले. ज्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट होती. तसेच बिहारबाहेर किंवा इतर विधानसभा मतदारसंघात गेलेले 26 लाख मतदार असल्याचं समोर आलं आहे. याशिवाय दोन ठिकाणी 7 लाख लोकांनी आपली मते नोंदवली आहेत, जी स्पष्टपणे नियमांचे उल्लंघन आहे. या कारणांमुळे 51 लाख मतदारांची नावे मतदार यादीतून वगळता येतील, जेणेकरून फक्त पात्र मतदारांनाच यादीत समाविष्ट केले जाईल, असं आयोगाने म्हटलं आहे.