
सामना ऑनलाईन । पाटणा
बिहारमधील नालंदा जिल्ह्यात हुंड्यासाठी सासरच्यांनी सुनेला बेदम मारहाण करत तिचे डोळे फोडले. त्यानंतर तिला जबरदस्तीने विष पाजून तिला ठार केल्याची भयंकर घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीस अटक करण्यात आली असून इतर पाच जण फरार झाले आहेत. बबिता देवी (२८) असे मृत महिलेचे नाव आहे. तर सुधीर कुमार असे तिच्या पतीचे नाव आहे.
नालंदा येथील फुलवारिया गावातील सुधीरबरोबर बबिताचा विवाह झाला होता. पण बबिताने लग्नात सासरच्यांना अपेक्षित हुंडा न आणल्याने पती व सासू सासरे तिचा छळ करत होते. गुरुवारीही याच कारणावरून बबिताचा पतीबरोबर वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की पतीने व सासू सासऱ्यांनी बबिताला बेदम मारहाण केली. त्यानंतर नराधम पतीने बबिताचे डोळे फोडले. पण एवढे करूनही त्यांचे मन न भरल्याने त्यांनी बबिताला जबरदस्तीने विष पाजले. यात बबिताचा मृत्यू झाला.
बबिता मृत झाल्याचे बघताच सासरच्यांनी तिचा मृतदेह जहानाबाद येथे नेला व तेथील एका शेतात मृतदेह फेकला. शुक्रवारी सकाळी स्थानिकांना शेतात एका महिलेचा मृतदेह आढळला. त्यानंतर त्यांनी याबद्दल पोलिसांना कळवले. त्यानंतर तो मृतदेह बबिताचा असल्याचे समोर आले.

























































