
राज्यात सर्व शाळांमध्ये पहिलीपासून द्वैभाषिक अभ्यासक्रम लागू करण्याचे निर्देश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांना भविष्यात इंग्रजी भाषेची अडचण येऊ नये यासाठी इंग्रजीतील संकल्पना बालपणापासूनच स्पष्ट होण्याची आवश्यकता असते. यादृष्टीने येत्या शैक्षणिक वर्षापासून सर्व शाळांमध्ये पहिलीपासून एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यास लागू होणार आहे.
विद्यार्थ्यांना मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतील संज्ञा, संकल्पना अधिक स्पष्ट व्हाव्यात, इंग्रजी भाषेतील शब्दांची ओळख व्हावी यासाठी वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सध्या 488 आदर्श शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर पहिलीच्या अभ्यासक्रमात एकात्मिक आणि द्वैभाषिक पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. पुढील वर्षी या शाळांमध्ये दुसरीच्या वर्गामध्ये अशा अभ्यासक्रमांचा समावेश करावा. त्याचप्रमाणे टप्प्याटप्प्याने इतर शाळांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात येऊन मराठी शब्दांच्या जोडीला समानार्थी आणि सोप्या इंग्रजी शब्द आणि वाक्यांचा वापर करण्यात यावा. पाठय़पुस्तकांची रचना आकर्षक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्यात यावी, अशा सूचनाही वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत.




























































