अँड्रॉइड विकत घेतले नाही, ही आयुष्यातील मोठी चूक : बिल गेट्स

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गुगलला अँड्रॉइड विकसीत करण्याची संधी देणे आणि अँड्रॉइड विकत न घेणे ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, असे मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी म्हटले आहे. मात्र, आजही बाजारातील आव्हानांचा सामना करत मायक्रासॉफ्ट मजबूतीने उभी आहे, असे ते म्हणाले. गूगल अँड्रॉइडद्वारे बाजारात घडवणाऱ्या क्रांतीची त्यावेळी कल्पना आली नसल्याने आपण मागे पडलो. त्यावेळी योग्य निर्णय घेतला असता तर मायक्रोसॉफ्ट आज जगातील सर्वात मोठी कंपनी झाली असती असे ते म्हणाले. अर्ली स्टेज वेंचर कॅपिटल फर्म विलेज ग्लोबलच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे मत व्यक्त केले.

सॉफ्टवेअरच्या व्यवसायात मोबाईलमध्ये सशक्त असणाराच जगावर राज्य करतो, असे ते म्हणाले. त्यामुळे त्यावेळी आगामी काळाची चाहूल ओळखू शकलो नाही ही आपली मोठी चूक होती, असे ते म्हणाले. या आपल्या एका चुकीमुळे अँड्रॉइड ज्या स्थानावर आहे, त्या ठिकाणी मायक्रोसॉफ्ट पोहचू शकले नाही, असे ते म्हणाले. त्यावेळी बाजारात अॅपलव्यतिरिक्त ऑपरेटिंग सिस्टीमसाठी अनेक संधी होत्या. त्यामुळे वेळ न दवडता गूगलने या संधी साधल्या. या सर्व गोष्टी मायक्रोसॉफ्टलाही सहज शक्य होत्या. मात्र, त्या संधी आपण ओळखू शकलो नाही. त्यामुळे मायक्रोसॉफ्टचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी नॉन-अॅपल ऑपरेटिंग सिस्टमची किंमत 400 बिलियन डॉलर ( सुमारे 27,76,500 कोटी रुपये) होती. ते आपण सहज विकत घेऊ शकत होतो. मात्र, आपण ते केले नाही आणि गूगलने बाजी मारली. एका तासाच्या या कार्यक्रमात गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या यशांबाबत अनेक गोष्टी सांगितल्या. विंडोज आणि ऑफीस यासारख्या उत्पादनांमुळे मायक्रोसॉफ्टने यशाचे शिखर गाठल्य़ाचे ते म्हणाले. गूगलने 2005 मध्ये 50 मिलियन डॉलरमध्ये (सुमारे 347 कोटी) अँड्रॉइड विकत घेतले. गूगलने अँड्रॉइड विकत घेण्यामागे असलेले कारण कधीही स्पष्ट केले नाही. ज्यावेळी गूगल अँड्रॉइडच्या उत्पादनात गुंतले होते. त्यावेळी मायक्रोसॉफ्ट विंडोज मोबाईल ओएसवर काम करत होते. ते 2010 मध्ये विंडोजफोनद्वारे बाजारात आले. त्या वेळी योग्य निर्णय घेत आपण संधी साधली असती तर अँड्रॉइडद्वारे मायक्रोसॉफ्ट जगातील सर्वात मोठी कंपनी झाली असती असे ते म्हणाले. आपल्या या चुकीबाबत आपल्याला नेहमी खंत असते असेही त्यांनी सांगितले.