
रत्नागिरी तालुक्यातील बागपाटोळे गावात राष्ट्रीय पेयजल योजनेतून मंजूर झालेल्या विहिरीचे काम पूर्ण झालेले नसताना ठेकेदाराला संपूर्ण बील अदा करण्यात आले होते. त्यानंतर जिल्हापरिषद पाणीपुरवठा विभागाने याप्रकरणाची चौकशी सुरू केली असून आठ दिवसात चौकशीचा अहवाल मागितला आहे.
बागपाटोळे गावात राष्ट्रीय पेयजल योजनेतून मंजूर झालेल्या विहिरीचे काम पूर्ण झालेले नसताना ठेकेदाराला संपूर्ण बील अदा केल्याबाबत उपसरपंच वैभव चव्हाण यांनी आवाज उठवला होता. 2020 साली बागपाटोळेतील विहिरीसाठी 8 लाख रूपये मंजूर झाले होते. हे काम कोकण वैभव मागासवर्गीय मजूर सहकारी संस्थेला मिळाले होते. 2023 पर्यंत काम पूर्ण न झाल्याने उपसरपंच वैभव चव्हाण यांनी माहिती अधिकारात माहिती मागितली.त्यावेळी विहिरीचे काम अपूर्ण असताना विहिरीचे शंभर टक्के बील अदा झाल्याची माहिती मिळाली. याप्रकरणाची जिल्हापरिषद पाणीपुरवठा विभागाने चौकशी सुरू केली आहे.उपअभियंता दिवाकर पाटील यांची चौकशी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.चौकशी करून आठ दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

























































