‘बायोमेट्रिक’च्या घोळात पालिकेच्या हजारो कर्मचाऱ्यांना पगारच मिळाला नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
biometric attendance system issue no salary in bmc

सामना प्रतिनिधी । मुंबई

बायोमेट्रिक हजेरीच्या घोळात पालिकेच्या हजारो कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचा पगारच मिळालेला नाही. यामध्ये निवडणूक ड्युटीवर गेलेल्या कर्मचाऱ्य़ांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मे महिन्याची 9 तारीख उलटली तरी पगार मिळाला नसल्याने हे कर्मचारी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने पगार द्यावा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

पालिकेने कर्मचाऱ्यांची कार्यालयातील उपस्थितीची नोंद करण्यासाठी वर्षभरापूर्वी हजेरीपट पद्धत बंद करून बायोमेट्रिक पद्धत सुरू केली. मात्र सुरुवातीपासूनच बायोमेट्रिक हजेरीपटावरून अनेक वेळा पगाराचा गोंधळ झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बायोमेट्रिक यंत्रांना पुरेशी इंटरनेट कनेक्टिक्हिटी नसल्याने कर्मचारी हजर असल्यास गैरहजर दाखवणे, शिफ्ट करणाऱया कर्मचाऱयांची योग्य नोंद न होणे, कर्मचाऱयांनी घेतलेल्या रजांची व डय़ुटी बदलाची प्रणालीत नोंद न होणे अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत. याचा फटका हजारो कर्मचाऱयांना बसत आहे. दरम्यान, तांत्रिक दोषामुळे पगाराचा गोंधळ झाल्याचे प्रशासनाने मान्य करीत तातडीने पगार दिला जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

शून्य पगाराची स्लिप पाहून धक्का

महिनाभर काम केले असताना शून्य पगाराची स्लिप पाहून धक्का बसल्याचे कर्मचाऱयांनी सांगितले. पालिका कर्मचाऱयांचा पगार 1 तारखेला बँकेत जमा होतो, मात्र एप्रिलच्या 9 तारखेपर्यंत कर्मचाऱयांना पगार मिळालेला नाही. कुणाचे बँकांच्या कर्जाचे हप्ते व इतर उसनवारी असल्यामुळे कर्मचाऱयांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मार्चमध्येही बायोमेट्रिकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काही विभागांतील कर्मचाऱयांचे वेतन झाले नव्हते. आता पुन्हा असा प्रकार घडल्याने कर्मचाऱयांमधून संताप व्यक्त होत आहे.