
पुणे बिटकॉइन देण्याच्या बहाण्याने पाच जणांनी मिळून एकाला तब्बल 19 लाख 70 हजारांचा गंडा घातला. ही घटना नोव्हेंबर 2020 मध्ये घडली आहे. याप्रकरणी शनिवार पेठ येथे राहणाऱ्या 36 वर्षीय व्यक्तीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रंजित जनरल सिंह (वय 37, रा. मिराभाईंदर), शब्बीर शेख (वय 41, रा. मिरा रोड), सुजॉय पॉल (रा. हांडेवाडी), मंगेश कदम (रा. गोखलेनगर) आणि मुकूल (रा. मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपींची 19 मार्च 2020 रोजी नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील ‘प्रोजेक्टर रिअॅलिटी कार्यालयामध्ये भेट झाली होती. आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन करून दीड बिटकॉइन देण्याचे आमिष दाखविले.
त्यासाठी 19 लाख 70 हजार 886 रुपये सिंह याच्या खात्यात ‘ट्रान्स्फर’ करण्यास भाग पाडले. मात्र, आरोपींनी त्यांना बिटकॉइन दिला नाही. त्याशिवाय पैसेही परत करता फसवणूक केली आहे. शिवाजीनगर पोलिस तपास करत आहेत.


























































