
चांगल्या धोरणांना सुरुवातीला विरोध करायचा, त्याची यथेच्छ बदनामी, टिंगलटवाळकी करायची आणि नंतर जनतेचा दबाव आणि वास्तवाचा सामना करण्याची वेळ आली की तेच धोरण आपले म्हणून स्वीकारायचे, या आपल्या कार्यपद्धतीला अनुसरूनच भाजप सरकारने जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्याचा टोला काँग्रेसने आज लगावला.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक्सवर पोस्ट करत जातनिहाय जनगणनेवरून भाजपने आजवर घेतलेल्या विरोधाच्या भूमिकेचा समाचार घेतला. मोदी सरकारकडे स्वतःचे कोणतेही व्हिजन नाही किंवा समस्या सोडवण्याची कोणतीही दिशा नाही. ते केवळ जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मुख्य मुद्दय़ांपासून पळ काढत, त्यांचा द्वेषाचा, विभाजनवादाचा अजेंडा पुढे नेण्यात पटाईत आहेत, अशा शब्दांत रमेश यांनी भाजपच्या राजनीतीचा खरपूस समाचार घेतला.
भाजप सरकारने प्रत्येक चांगल्या योजनेला किंवा धोरणाला आधी विरोध केला, त्याची बदनामी केली आणि सार्वजनिक दबाव आणि वास्तवाला सामोरे जाताना तेच धोरण स्वीकारले, असे सांगत रमेश यांनी काही उदाहरणेही दिली.
रमेश यांनी दिलेली उदाहरणे
z जग ज्याला ग्रामीण रोजगार आणि गरिबी निर्मूलनाचे मॉडेल म्हणत होते त्या मनरेगाला मोदींना संसदेत ‘अपयशाचे स्मारक’ म्हटले. मनरेगाची खिल्ली उडवली. लोक खड्डे खोदत आहेत, असे म्हटले गेले. कोरोनासारख्या संकटात मनरेगा देशातील गरीबांचा कणा बनली. आता त्याचे श्रेय घेत आहेत.
z विरोधात असताना आधारमुळे गोपनीयतेच्या हक्काला धक्का पोहोचेल, तो फक्त राजकीय स्टंट आहे, अशी टीका भाजपने केली; परंतु सत्तेत येताच त्यांनी आधारला कल्याणकारी व्यवस्थेचा पाया बनवले.
z जीएसटीलाही कडाडून विरोध केल्यानंतर भाजपने सत्तेत आल्यानंतर त्यात कोणतेही मोठे बदल न करता लागू केले. नंतर जीएसटी त्यांच्यासाठी ‘गेम चेंजर’ बनले.
z गरजूंच्या खात्यात थेट लाभ पोहोचविण्याच्या डीबीटीलाही त्यांनी विरोध केला. आता डीबीटी लागू करत ‘डिजिटल इंडिया’चे ढोल पिटत आहेत.
z महिलांना रोख मदत देण्याच्या काँग्रेसच्या धोरणाला विरोध केल्यानंतर आज तेच भाजपा महिलांसाठी वेगवेगळय़ा रोख हस्तांतरण योजना चालवत आहे.