पाटणामध्ये भाजपची काँग्रेसच्या कार्यालयासमोर निदर्शने; दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

बिहारच्या पाटणामध्ये भाजपने काँग्रेस कार्यालयासमोर काँग्रेसविरोधात निदर्शने केली. त्यानंतर संतापलेले काँग्रेस कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यानंतर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये लाठीकाठीने तुंबळ हाणामारी सुरू होती.

काँग्रेस नेत्यांनी आरोप केला की भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाचे गेट तोडले आणि आत घुसून लाठीमार केला. कार्यालयात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली आणि विटा आणि दगडही फेकले. यामध्ये काही काँग्रेस कार्यकर्ते जखमीही झाले आहेत. एका कार्यकर्त्याचे डोके फ्रॅक्चर झाले. भाजप नेत्यांनी सदाकत आश्रमात मोर्चा काढला आणि राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या इतर नेत्यांविरुद्ध घोषणाबाजी केली. या निषेधादरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी पटना येथील काँग्रेस राज्य मुख्यालय ‘सदाकत आश्रम’ची तोडफोड केली. त्यांनी काँग्रेस कार्यालयाचे गेट जबरदस्तीने उघडले आणि आत प्रवेश केला. यादरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना प्रतिकार केला आणि लवकरच दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली.

राजद आणि काँग्रेसच्या संयुक्त रॅलीत शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध अपशब्द वापरल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी पाटण्यातील काँग्रेस कार्यालयाबाहेर निषेध केला. यादरम्यान, भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांनी काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला आणि त्यानंतर हाणामारीला सुरुवात झाली.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पाटणा पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून हटवून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.