
मुंबई महानगरपालिका निवडणूक महायुती करून लढण्याचा निर्णय भाजप आणि शिंदे गटाने घेतला आहे. मात्र, शिंदे गटात नसलेल्या नगरसेवकांचे प्रभाग सोडण्यास भाजपने विरोध केला आहे. तसेच 2017 च्या निवडणुकीत कमी फरकाने हरलेल्या जागांवरही भाजपने दावा ठोकल्यामुळे महायुतीच्या जागावाटपात 77 जागांवरून तिढा निर्माण झाला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या जागावाटपाबाबत महायुतीच्या नेत्यांची दुसरी बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत मुंबई पालिकेच्या 227 प्रभागांपैकी 125 जागा मिळाव्यात असा आग्रह शिंदे गटाने धरला. मात्र, भाजपने 150 जागांवर दावा सांगत त्यांची मागणी फेटाळून लावत फारफार तर 77 जागा शिंदे गटाला सोडण्याची तयारी दाखवली आहे. ज्या जागांवरून दोन्ही पक्षांत तिढा आहे, अशा जागांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढण्यात येणार आहे.
या 150 जागांवर एकमत
महायुतीच्या बैठकीत 150 जागांवर एकमत झाल्याचे सांगितले जात आहेत. यामध्ये भाजपने 2017 च्या निवडणुकीत जिंकलेल्या अलीकडच्या काळात भाजपमध्ये अन्य पक्षातून जे प्रवेश झाले आहेत अशा 87 जागांचा समावेश आहे. शिवसेनेचे जे नगरसेवक शिंदे गटात आहेत तसेच कॉँग्रेस व अन्य पक्षातून ज्यांनी प्रवेश केला आहे अशा 63 जागा शिंदे गटाकडे ठेवण्याबाबत दोन्ही पक्षांत एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
8 ते 10 विधानसभा क्षेत्रात शिंदे गटाला एकही जागा नाही
मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 8 ते 10 विधानसभा क्षेत्रांमध्ये शिंदे गटाला एकही जागा सोडण्यास भाजपचा विरोध आहे. यामध्ये मागाठणे, गोरेगाव, अंधेरी पश्चिम, विलेपार्ले, वांद्रे पश्चिम, घाटकोपर पश्चिम, वडाळा, मलबार हिल आदी मतदारसंघांचा समावेश आहे. याशिवाय मराठीबहुल भागांमध्येही भाजपकडून दावा केला जात आहे.
जागावाटप दोन-तीन दिवसांत पूर्ण
महायुतीच्या बैठकीनतर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि मंत्री उदय सामंत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत जागावाटप दोन-तीन दिवसांमध्ये पूर्ण होईल, अशी माहिती दिली. जागा किती कोण लढत याच्यापेक्षा आम्ही महायुतीने पुढे जात आहोत. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. अमित शहा यांनी सांगितल्याप्रमाणे 150 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य असल्याचे उदय सामंत म्हणाले.





























































