
एका नामांकित शाळेतील दोन चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी ‘पोक्सो’ कायद्याखाली गुन्हा दाखल झालेला आणि जामिनावर बाहेर असलेला भाजपचा पदाधिकारी, शाळेचा सचिव तुषार आपटे याला अखेर आज अंबरनाथ नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा लागला. अंबरनाथ नगर परिषदेत भाजप-अजित पवार गटाची सत्ता आल्यानंतर तुषार आपटे याला स्वीकृत नगरसेवकपदाचे बक्षीस भाजपने दिले होते. भाजपने ‘विकृताला’ ‘स्वीकृत’ केले अशी टीकेची झोड विरोधकांनी उठवताच चोवीस तासांच्या आत पद खालसा करून आपटे याचा राजीनामा घेण्याची नामुष्की भाजपवर आली आहे.
बदलापूरमधील एका नामांकित शाळेत ऑगस्ट 2024 रोजी दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची बाब उघडकीस आल्यानंतर बदलापूरमध्ये प्रचंड जनक्षोभ उसळला होता. या शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटेने तक्रार करण्यासाठी आलेल्या पालकांना हाकलून लावत शाळेतील पंधरा दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब केले होते. या घटनेने अवघा देश हादरून गेला होता.
या अत्याचारप्रकरणी तक्रार देण्यास टाळाटाळ केल्याच्या 21 (2) कलमाखाली उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांच्यावर ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना सहआरोपी करण्यात आले होते. त्यानंतर कोतवाल आणि आपटे फरार झाले. तब्बल 35 दिवसांनंतर त्यांना कर्जतच्या फार्महाऊसवर अटक करण्यात आली. सध्या दोघेही जामिनावर बाहेर आहेत. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात आपटे व कोतवाल यांच्यावर खटला सुरू आहे.
बालिका लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी असलेल्या तुषार आपटेला भाजपने अंबरनाथ नगरपरिषदेत सत्ता येताच शुक्रवारी स्वीकृत नगरसेवकपदाचे ‘गिफ्ट’ दिले. याबाबतच्या बातम्या आज वृत्तपत्रांमधून झळकल्या आणि भाजपच्या विवेकशून्य आणि निर्लज्ज राजकारणावर टीकेची झोड उठली. त्यानंतर मुंबईपासून नागपूरपर्यंत फोनाफोनी झाली आणि अवघ्या 24 तासांच्या आत आपटेला स्वीकृत नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर त्याने आपला राजीनामा आज अंबरनाथच्या मुख्याधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. शाळेची आणि भाजपची बदनामी होऊ नये म्हणून मी राजीनामा देत असल्याची मखलाशी आपटेने केली.
‘स्वीकृत’ करण्यासाठी थेट नागपुरातून फोन
तुषार आपटे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहे. स्थानिक भाजपचा तो पदाधिकारी आहे. आपटेने नगरसेवकपदाचे तिकीट मागितले होते, मात्र भाजप आमदार किसन कथोरे यांनी आपटेचे तिकीट कापून तिथे त्यांच्या दोन मर्जीतल्या कार्यकर्त्यांची वर्णी लावली. आपटेने हे गाऱहाणे थेट नागपुरातील संघ मुख्यालयात घातले आणि तेथूनच त्याला स्वीकृत नगरसेवक करून घ्या असे आदेश आले अशी चर्चा बदलापुरात सुरू आहे.
भाजपचा आणखी एक कारनामा; दंगलीच्या आरोपीला केले उपनगराध्यक्ष
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक केल्यानंतर भाजपवर टीकेची झोड उठली असतानाच बदलापूर नगर परिषदेत भाजपचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. बदलापूरच्या उपनगराध्यक्षपदी दंगलीचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपी प्रियांका दामले यांची निवड झाली आहे. बदलापूरच्या नामांकित शाळेतील चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर आंदोलन भडकले. यावेळी प्रियांका दामले यांनी सोशल मीडियाचा वापर करून जमाव गोळा केला, त्यांना भडकवले आणि दंगल घडवण्यास प्रवृत्त केले असे गुन्हे बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे व रेल्वे पोलिसांनी दाखल केले आहेत.





























































