अभिनेत्रींनी फक्त मुंबईत नाचावं, जेएनयूत कशाला येतात, भाजप नेत्याची जीभ घसरली

922

अभिनेत्री दीपिका पदूकोण हिने दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात जाऊन तेथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. तिच्या या भेटीवरून तिच्यावर कौतुकाचा तसेच टीकेचाही वर्षाव होत आहे. या भेटीवरून भाजपचे मध्य प्रदेशमधील नेते गोपाल भार्गव यांनी दीपिकावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे.

‘अभिनेत्रींनी मुंबईत बसून नाचगाणं करावं. जेएनयूमध्ये ती का आली तेच मला समजत नाही. अशा प्रकारची डझनभर लोकं झालीत जी स्वत:ला आर्टिस्ट, अॅक्टिव्हिस्ट म्हणवून घेतात’, अशी टीका गोपाल भार्गव यांनी केली आहे. गोपाल भार्गव हे मध्य प्रदेशमधील हारडा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. ते या मतदारसंघातून सलग 15 वर्ष आमदार होते.

नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी रात्री काही समाजकंटकांनी हल्ला केला. या हल्ल्यात अनेक विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले आहेत. या हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. या हल्ल्याविरोधात जेएनयूचे विद्यार्थी निदर्शने करत असताना अभिनेत्री दीपिका पदुकोणने विद्यापीठाला भेट दिली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या हल्ल्याचा निषेध करत तिने विद्यार्थ्यांना पाठिंबा जाहीर केला.

आपली प्रतिक्रिया द्या