चीनच्या बॉर्डरवर ‘भाजप’राज, तीन राज्यात बनवले सरकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानातील पाच राज्यांच्या सीमारेषा चीनसोबत जोडलेल्या आहेत. या पाच पैकी तीन राज्यांमध्ये आता भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले आहे. बुधवारी अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते पेमा खांडू यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चीनशी लागून असलेल्या तिसऱ्या राज्यात भाजपची सत्ता स्थापन झाली. याआधी हिमाचल प्रदेश आणि उत्तरांचलमध्ये भाजपने सत्ता स्थापन केली आहे.

अरुणाचलमध्ये ‘पेमा’राज, भाजपच्या पेमा खांडू यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

चीनशी लागून असणाऱ्या सिक्कीम आणि जम्मू-कश्मीर या राज्यांमध्ये भाजप सरकार नाही. जम्मू-कश्मीरमध्ये भाजपने पीडीपीला सोबत घेऊन सरकार स्थापन केले होते, परंतु नंतर पाठिंबा काढून घेतला आणि सरकार पाडले. यानंतर आता येथे राज्यपाल शासन लागू आहे. तर सिक्कीममध्ये सिक्किम क्रांतिकारी मोर्चा (एसकेएम)चे सरकार आहे.

देशात नुकतीच सात टप्प्यामध्ये निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये एनडीएने ऐतिहासिक यश मिळवले. लोकसभा निवडणुकीसह काही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका देखील पार पडल्या. यातही भाजपने चांगली कामगिरी केली. अरुणाचलप्रदेशमध्ये भाजपने 60 जागांपैकी 41 जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आणि सरकार स्थापन केले. केंद्रात आणि राज्यामध्ये भाजपचे सरकार असल्याने चीनकडून सुरू असणाऱ्या कारवायांना आळा घालण्याची नामी संधी उपलब्ध असणार आहे.

सिक्कीममध्ये नवे सरकार
विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळवल्यानंतर सिक्किम क्रांतिकारी मोर्चा (एसकेएम)चे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. सोमवारी सिक्किम क्रांतिकारी मोर्चा (एसकेएम)चे अध्यक्ष प्रेम सिंह तमांग यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तमांग यांच्यासह 11 मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. तमांग यांनी 24 वर्षापेक्षा जास्त काळ सत्तेवर राहिलेले चामलिंग सरकारचा पराभव केला.