भाजपच्या विचारधारेत महाराष्ट्राच्या अस्मितेशी द्रोह, बहुजन महापुरूषांचा अपमान करणे, हे ठासून भरलेले आहे – हर्षवर्धन सपकाळ

भाजपच्या विचारधारेत महाराष्ट्राच्या अस्मितेशी द्रोह, बहुजन महापुरूषांचा अपमान करणे, हे ठासून भरलेले आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. X वर पोस्ट करत ते असं म्हणाले आहेत.

X वर पोस्ट करत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भगतसिंह कोश्यारी या विकृत माणसाला महाराष्ट्राच्या कोट्यातून पद्म पुरस्कार देण्यात आला. तसेच काल प्रजासत्ताकदिनी याच भाजप सरकारचे मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख भाषणात न करून अपमान केला. अगोदर वनअधिकारी माधवी जाधव यांनी तिथेच विरोध केला, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राने संताप व्यक्त केल्यावर यांना चूक झाल्याची सद्बूद्धी सुचली, तरी माफी मागताना यांचा माज काही गेला नाही. ‘भाषणात अनावधानाने एक नाव राहिलं तर एवढा विषय वाढवू नये’ ‘मी गावात पंगत देतो, त्यांच्यासोबत जेवायला बसतो, 40 वर्षात अंगात निळा शर्ट घातला नाही, असं कधी झालंय का?’ यासारख्या त्यांच्या विधानांतून त्यांच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच समाजाबद्दल तुच्छतेची भावना किती आहे, हे दिसून येते. अशा व्यक्तीला महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात राहण्याचा काही एक अधिकार नाही. तत्काळ त्यांचा राजीनामा घेऊन मंत्रीमंडळातून त्यांना बेदखल करण्यात यावे.”

ते म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेत महाराष्ट्राच्या अस्मितेशी द्रोह, बहुजन महापुरूषांचा अपमान करणे, हे ठासून भरलेले आहे, या महाराष्ट्रद्रोह्यांना महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही.”