संविधान बदलू पाहतेय BJP, तेजस्वी यादव यांचा भाजपवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

“आरएसएस आणि भारतीय जनता पक्ष देशाचे संविधान बदलू इच्छितात, मात्र अल्पसंख्याक समाजाने आता सावध होण्याची गरज आहे,” असा हल्लाबोल बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. शनिवारी पाटण्यातील श्री कृष्ण मेमोरियल हॉलमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) अल्पसंख्याक सेलतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना ते असे म्हणाले आहेत.

आपल्या भाषणात तेजस्वी यादव म्हणाले की, भाजपला देशाच्या संविधानाऐवजी आरएसएसचे संविधान लागू करायचे आहे आणि लोकशाही संपवायची आहे. ते पुढे म्हणाले, “भूतकाळात आमच्याकडून काही चुका झाल्या असतील, पण त्या सुधारल्या जातील. ही वेळ आपापसात लढण्याची नाही. जर कोणी भडकवणारे भाषण करत असेल, तर त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. मग तो मी का असेना, माझ्यावरही कारवाई करा.”

यावेळी तेजस्वी यादव यांनी पश्चिम बंगालचे नेते हुमायूं कबीर यांचा उल्लेख करत गंभीर आरोप केले. “कबीर यांनी भाजपकडून १००० कोटी रुपये घेतले आहेत. समाजात भांडणे लावून सत्तेपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यांचे विचार ओळखा.”

तेजस्वी यादव पुढे म्हणाले की, “आम्ही लालू प्रसादांची मुले आहोत. हे तेच बिहार आहे जिथे लालूजींनी लालकृष्ण अडवाणींचा रथ रोखून त्यांना अटक केली होती. जेव्हा मी कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न विचारतो, तेव्हा माझ्यावर खोट्या केसेस टाकल्या जातात. पण भाजपने हे समजून घ्यावे की, लालू प्रसाद कधी झुकले नाहीत, तर त्यांचा मुलगा कसा झुकणार?”