चंद्रकांत पाटील यांना मिरजेत घेरावा

मिरज शहरात विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना रेल्वे स्थानक रस्त्याच्या दुरवस्थेची पाहणी करण्याचा आग्रह करीत नागरिक व रिक्षाचालकांनी घेराव घातला. पण चंद्रकांत पाटील यांनी पाहणी न करताच तेथून काढता पाय घेतल्याने संतप्त नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या गोंधळामुळे पाटील यांनी नगरसेवकांची खरडपट्टी काढली.

मिरजेतील ‘किरण’ हॉटेल ते रेल्वेस्थानक रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्यावरून गेले अनेक दिवस ड्रेनेजचे व सांडपाणी वाहत आहे. 87 लाख रुपये खर्चून करण्यात येणाऱया या ट्रिमिक्स रस्त्याच्या उद्घाटनासाठी चंद्रकांत पाटील हे मिरजेत बसस्थानक चौकात आल्यानंतर नागरिकांनी रेल्वे स्थानकासमोर वाहणारे सांडपाणी व रस्त्याची दुरवस्था पाहण्याचा आग्रह धरला. मात्र, त्यास नकार देत पाटील गाडीत बसले. नागरिकांनी त्यांच्या गाडीला घेराव घालत घोषणाबाजी केली. मात्र, त्यांनी काढता पाय घेतल्याने नागरिक संतप्त झाले.

प्रभाग सभापती गायत्री कुल्लोळी, नगरसेविका स्वाती शिंदे, अप्सरा वायदंडे यांनाही तेथे रोखले; पण आंदोलकांची समजूत काढून या नगरसेविका तेथून निघून गेल्या. यामुळे पाटील यांनी पुढे पुजारी चौकातील रस्तेकामाच्या उद्घाटनात नगरसेवकांची खरडपट्टी काढली. चांगल्या गटारी बांधून रस्त्यावरून वाहणाऱया सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची सूचना त्यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या