हा गांधींचा नव्हे, मोदींचा हिंदुस्थान, भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘हा गांधी-नेहरूंचा नाही, तर नरेंद्र मोदी-अमित शहा यांचा हिंदुस्थान आहे. आदेश मिळाला तर एका तासात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (सीएए) विरोध करणाऱयांना नष्ट करू’ असे वादग्रस्त विधान भाजपचे हरयाणातील आमदार लीलाराम गुर्जर यांनी केले आहे. मात्र, या वक्तव्यानंतर काही वेळाने घूमजाव करीत देशातील घुसखोर आणि दहशतवाद्यांबद्दल आपण बोलत होतो अशी सारवासारव त्यांनी केली.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि ‘एनआरसी’ला देशभरातून जोरदार विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या कायद्याविषयी जागरूकता करण्यासाठी आणि या कायद्याच्या समर्थनार्थ भाजप सभा घेत आहे. हरयाणात सभेत बोलताना भाजप आमदार लीलाराम गुर्जर यांनी ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’ला विरोध करणाऱयांवर टीका केली. ‘हा गांधी आणि नेहरूंचा हिंदुस्थान नाही, तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा देश आहे. आदेश मिळताच देशाचे नुकसान करणाऱयांना एका तासातच संपवू’ असे गुर्जर म्हणाले. गुर्जर यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.