भाजप नेत्याचा चिमुरडीवर बलात्कार, मध्य प्रदेशातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । भोपाळ

सात वर्षांच्या बालिकेवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात मध्य प्रदेशातील अगर जिह्यात एका भाजप नेत्याला अटक करण्यात आली आहे. त्याचे नाव नारायण माळी (४०) असे असून तो पिपलोन या शहरात जनरल स्टोअर चालवतो.

पीडित बालिकेला मिठाई, चॉकलेट चारून भाजपचा तो नेता गेले दोन महिने तिच्यावर बलात्कार करीत होता, असे पोलिसांनी सांगितले. त्या बालिकेवर आपल्या दुकानातच बलात्कार करीत आलेल्या नारायण माळी याला पोलिसांनी रविवारी पीडितेसोबत रंगेहाथ पकडले. त्याच्या विरोधात आयपीसीच्या कलम ३७६ आणि पॉस्को कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणावरून मध्य प्रदेश काँग्रेसने भाजपचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या सरकारचा तीक्र शब्दांत निषेध केला आहे. कथुआपासून उन्नाव येथील बलात्काराच्या घटनांमध्ये भाजप सरकारने बलात्कारी नराधमांना पाठीशी घातले आहे, असे काँग्रेसच्या प्रवक्त्या शोभा ओझा यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांची खिल्ली उडवण्यातच भाजपचे मंत्री, नेत्यांचा सारा वेळ जात असतो. महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करायला त्यांच्याकडे वेळ आहेच कुठे, असेही त्या म्हणाल्या.