भाजपचे संपर्क मंत्री फक्त कार्यकर्त्यांकडे जेवायला जातात, भाजप नेत्याचा घरचा आहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

देशात सर्वत्र भाजपाची सत्ता असल्यामुळे उजेड आहे परंतु नांदेडमध्ये अंधार, हे सध्याचे चित्र बदलण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सूर्यकांता पाटील यांनी आज केले. तसेच “भाजपचे किमान पंधरा दिवसांनी येथील असा संपर्क मंत्री पाहिजे. सध्याचे संपर्क मंत्री कोण्या एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी जेवायला येतात. त्या पलीकडे त्यांचा फारसा संपर्क नसतो,” असा घरचा आहेरच त्यांनी भाजपला दिला. गेल्या तीन-चार वर्षात काही मोजक्या कार्यक्रमांना हजेरी लावलेल्या सूर्यकांता पाटील यांनी आज प्रदीर्घ कालावधीनंतर प्रथमच महानगर भाजपाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून पक्ष नेत्यांच्या कार्यपध्दतीविषयी जोरदार फटकेबाजी केली.

महानगर भारतीय जनता पक्षाच्या वतीने रविवारी शहरातील महात्मा फुले मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, माजी खासदार डी.बी.पाटील, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, महानगर भाजपा अध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे, आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना सूर्यकांता पाटील म्हणाल्या की, “हे वर्ष निवडणूकांचे आहे, परंतु त्यासाठी राजकीय कार्यकर्त्यांनी जेवढ्या सजगतेने काम करायला पाहिजे तेवढी सजगता दिसत नाही. महिलांचा सहभागही नगण्य असल्याचे त्या म्हणाल्या. येणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणूका आपल्याला लढवायच्या आहेत. कार्यकर्ते म्हणजे पाया आहे आणि पाया कच्चा असेल तर इमारत ढासळायला वेळ लागत नाही, त्यामुळे आधी पाया पक्का करा,” असेही त्यांनी सूचित केले.

नरेंद्र मोदी आहेत, म्हणून उगीचच स्वप्न रंगवत न राहता त्यांना अजून पाच वर्ष पंतप्रधान म्हणून राहण्यासाठी आपल्यालाही प्रयत्न करावे लागतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासारख्या नेत्यांची आम्हाला गरज आहे. एक रस्ता करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात याची जाणीव आम्हाला आहे, परंतु गडकरींमुळे आज  सगळीकडे समुद्रासारखे रस्ते झाले आहेत. वर्षा बंगल्यावर पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस अलीकडच्या काळातले पहिले मुख्यमंत्री आहेत, असे गौरवोदगार त्यांनी काढले.

आम्हाला तुमच्याकडून फार काही अपेक्षा नाहीत, परंतु आमची कुठे मदत होत असेल तर ती घ्यायची की नाही हे तुम्ही ठरवा, असे त्या म्हणाल्या. कार्यकर्त्यांचा लोकांशी संपर्क असणे महत्वाचे आहे. मुख्यमंत्र्यांना सांगून नांदेड जिल्ह्यासाठी स्ट्राँग संपर्क मंत्री द्या, असे सांगताना त्या म्हणाल्या की, किमान पंधरा दिवसांनी येथील असा संपर्क मंत्री पाहिजे. सध्याचे संपर्क मंत्री कोण्या एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी जेवायला येतात. त्या पलीकडे त्यांचा फारसा संपर्क नसतो, अशा शब्दात पाटील यांनी संपर्कमंत्र्यांच्या कार्यपध्दतीवर आपल्या खास शैलीत तोफ डागली.