
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. सोमवारी निवडणूक अधिकारीसह विभागीय आयुक्त संजय अग्रवाल यांनी सुशील मोदी यांना प्रमाणपत्र दिले. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांच्यसह अनेक मंत्री उपस्थित होते.
भाजप नेते सुशील मोदी आधी विधानसभा, लोकसभा आणि विधान परिषदेनंतर राज्यसभेचे सदस्य झाले आहेत. सुशील मोदी बिहारचे असे तिसरे नेते आहेत जे चारही सदनाचे सदस्य राहिले आहेत. चारही सदनाचे सदस्य राहिलेले भाजपमधील ते एकमेव नेते आहेत. सुशील मोदी यांच्याआधी बिहारमधून आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि माजी केंद्रीय मंत्री नागमणी हे चारही सदनाचे सदस्य राहिले आहेत.

यावेळी उपस्थित मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, ‘सुशील मोदी यांनी बिहारची खूप सेवा केली आहे. मला खात्री आहे की पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली ते देशाची सेवा करतील. केंद्र सरकारच्या सहकार्याचा फायदा बिहारला मिळत आहे आणि तो मिळतच राहील.’





























































