
पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमधील जे सहकारी आहेत त्यांच्या मनात आता वेगळी भावना आहे. पण आता जे कोणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप तगडा उमेदवार देईल पण आम्ही महाआघाडी म्हणून त्यांना निवडून आणू असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी सांगितले.
कोल्हापूर जिल्हय़ातील हातकणंगले मतदारसंघातील माजी आमदार राजीव आवळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी साद घातली. ते म्हणाले की, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, जयसिंगराक गायकवाड व आता राजीव आवळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आघाडीचे सरकार येणार नाही असे समजून अनेक जण तिकडे गेले. पण आता त्यांनाही आघाडी सोडून का गेलो असे वाटायला लागले ही वस्तुस्थिती असल्याचे अजित पवार म्हणाले. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी भरती होणार आहे असेही ते म्हणाले.

































































