सरकारचे हायकमांड हे देवेंद्र फडणवीसच, कोणाला किती दिवस… भाजप आमदार जयकुमार गोरेंचं मोठं वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजित पवार यांचा गट बंडखोरी करत सरकारमध्ये सामिल झाला. त्यामुळे मिंधे गटाचे चांगलेच वांधे झाले. त्यात अजित पवार यांना अर्थमंत्रीपद मिळू नये म्हणून जंग जंग पछाडणाऱ्या मिंधे गटाच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली. त्यामुळे सध्या मिंधे गट चांगलाच नाराज आहे. त्यात भाजपने अजित पवार गटाला का सरकारमध्ये सामिल केले असा सवालही केला जात आहे.

याबाबत बोलताना भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यातील सरकारचे हायकमांड हे देवेंद्र फडणवीसच असल्याचे जयकुमार गोरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे असले तरी सरकारची पूर्ण दोर ही देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे. तसेच जयकुमार गोरे यांचा हा टोला मिंधे गटाला आहे की अजित पवार गटाला अशीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात भारतीय जनता पार्टीची सातारा येथे एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीत कार्यकर्त्यांशी बोलत असताना गोरे यांनी एक मोठं वक्तव्य केलं. ”आपल्या भारतीय जनता पार्टीने घेतलेला निर्णय खूप विचार करून घेतलेला आहे. आपलं नेतृत्व खूप सक्षम आणि खूप विचारी आहे. त्या नेतृत्वाला माहिती आहे, कोणाला आपल्याबरोबर घ्यायचं, कोणाला सोडायचं, कोणाला किती दिवस आपल्याबरोबर ठेवायचं आणि कोणाला कधी सोडायचं? हे सगळं आपल्या नेतृत्वाला माहिती आहे. तसेच या सरकारचे हायकमांड हे देवेंद्र फडणवीसच आहेत.” असे आमदार गोरे यांनी हे वक्तव्य करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधत होते का? यावर आता चर्चा सुरू आहेत.