मीरा–भाईंदर पालिकेत रणकंदन,  शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला भाजप आमदाराचा विरोध

683

मीरा-भाईंदर शहरात होणार्‍या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नियोजित स्मारक होऊ नये यासाठी कुटील कारस्थान करणारे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात शिवसेना नगरसेवकांच्या संतापाचा भडका उडाला.  मेहता यांच्या इशार्‍यावरून भाजपने आज स्थायी समितीच्या बैठकीत निधीचे कारण देत या स्मारकाला विरोध केला. त्यामुळे  मेहता यांचा शिवसेना स्टाईल उद्धार करतानाच नगरसेवकांनी पालिकेत खुर्च्या, काचा आणि टेबलांची तोडफोड केली.  शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाबाबत राजकारण करण्याची किंमत मेहता यांना चुकवावीच लागेल, असा सज्जड इशाराच त्यांनी यावेळी दिला.

भाईंदर पूर्व येथील सर्व्हे क्रमांक 122 या पालिकेच्या आरक्षित भूखंडावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य कलादालन उभारण्याच्या निविदेला मंजुरी देण्यासाठीचा गोषवारा पालिकेने आज  स्थायी समितीत सादर केला. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता  लागण्याआधीची स्थायी समितीची ही शेवटची बैठक होती. आज स्थायी समितीच्या या बैठकीत मंजुरी मिळून स्मारकाचे काम लवकरच सुरू होईल म्हणून शिवसेनेच्या स्थायी समिती सदस्यांसह सर्व नगरसेवक या सभेसाठी उपस्थित होते. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा विषय पटलावर घ्यावा अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक सातत्याने करत होते, परंतु स्थायी समितीचे सभापती रवी व्यास यांनी हा विषय घेण्यास नकार दिला. दरम्यान, हा विषय कोणत्याही परिस्थितीत बैठकीत येता कामा नये असे ‘अलिखित’ आदेश भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी दिल्याची कुणकुण शिवसेना नगरसेवकांना लागली आणि त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला.

विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील, गटनेते हरिश्चंद्र आमगावकर, नगरसेवक राजू भोईर, दिनेश नलावडे, जयंतीलाल पाटील, धनेश पाटील, एलायस बांडय़ा, अनंत शिर्के, नगरसेविका तारा घरत, नीलम ढवण, कुसुम गुप्ता, वंदना पाटील, स्नेहा पांडय़े, हेलन जॉर्जी, शर्मिला बागर्जी, शैलेश पांडेय यांच्यासह सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांनी भाजप आमदार मेहता यांच्या मनमानी कारभाराचा निषेध केला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो.. शिवसेना झिंदाबाद… अशा घोषणा देत संतप्त नगरसेवकांनी स्थायी समिती दालनात तोडफोड केली, खुर्च्याही फेकल्या. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा महापौर दालनाकडे वळवला. तेथेही त्यांनी काचा, संगणक, खुर्च्यांची तोडफोड केली. यामुळे महापालिकेत प्रचंड गोंधळ उडाला.

शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनीही निधी दिला

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलादालन आणि प्रमोद महाजन स्मारक या दोन्ही कामांच्या निविदा मंजुरीसाठी पालिकेने आज गोषवारा दिला. यातील शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला 25 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. आमदार प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक यांनी आपल्या निधीतून प्रत्येकी 25 लाख रुपये दिले आहेत, तर खासदार राजन विचारे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचाही निधी या कलादालनासाठी मिळणार आहे. नगरसेवक तथा गटनेते हरिश्चंद्र आमगावकर, जयंतीलाल पाटील, तारा घरत, स्नेहा पांडे यांनी प्रत्येकी 25 लाखांचा निधी या स्मारकासाठी दिला आहे. यात शिवसेनाप्रमुखांच्या कलादालनाला पहिल्या टप्प्यात 5 कोटी 82 लाख 69 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी शायोना कॉर्पोरेशन आणि गजानन कन्स्ट्रक्शन कंपनी  यांच्या निविदा होत्या. त्यातील एका निविदेला मंजुरी देण्याचा विषय आजच्या स्थायी समितीमध्ये अपेक्षित होता. मात्र तरीही निधीचे कारण देत स्थायी समिती सभापती रवी व्यास यांनी हा विषय पटलावर घेण्यास नकार दिला .

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाची निविदा टाळण्याची ही तिसरी वेळ. यापूर्वी झालेल्या दोन स्थायी समिती बैठकीत थातुरमातुर कारणे देऊन निविदा टाळण्यात आली होती. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे यांनी फोन करून निविदा मंजूर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र यावेळीही तेच घडले. त्यामुळेच शिवसेनेच्या नगरसेवकांचा उद्रेक झाला.- प्रताप सरनाईक, आमदार, मीरा-भाईंदर संपर्कप्रमुख

भाजपच्या महिला महापौरांनी मेहतांचे थोबाड फोडले

महिला महापौर असतानाही शिवसेना नगरसेवकांनी तोडफोड केली, असा कांगावा करणार्‍या नरेंद्र मेहतांचे थोबाड भाजपच्या माजी महापौर गीता जैन यांनी फोडले. त्या म्हणाल्या, शिकसेनेच्या मागणीचे मी पूर्ण समर्थन करते. महापौर दालनाच्या तोडाफोडीनंतर आमदार नरेंद्र मेहता आता महिलांच्या आत्मसन्मानाची गोष्ट करत आहेत. मात्र ज्यावेळी यांच्याच साथीदारांनी माझ्या नावाने शिमगा केला. माजी नगरसेविका सीमा जैन, सामाजिक कार्यकर्ते वसंत माने, राजू गोहिल यांच्या घरी त्यांची पत्नी आणि मुलगी असताना जेव्हा त्यांच्या घरात घुसून हल्ला केला तेक्हा त्यांना महिलांचा सन्मान आठवला नाही काय? मेहतांच्या तोंडी हे डायलॉग शोभत नाहीत.

पालिकेत निधी नाही तर मेहता शंभर कोटींवरील कामाची उद्घाटने करत का सुटले आहेत?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाचे आजही आमच्याशी ऋणानुबंध आहेत. शिवसेनाप्रमुख महाराष्ट्राचे दैवत आहेत. पालिका महासभेत काँग्रेसने शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला एकमुखाने अनुमोदन दिले आहे. अशावेळी पालिकेकडे निधी नसताना एकीकडे भाजप आमदार नरेंद्र मेहता शहरात शंभर कोटींच्या वरील कामाची उद्घाटने करत सुटले आहेत, तर दुसरीकडे निधीच्या नावाखाली शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला ते विरोध करत आहेत, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. आम्ही त्यांचा निषेध करतो. या शहरात शिवसेनाप्रमुख आणि स्वर्गीय प्रमोद महाजन यांचे कलादालन झालेच पाहिजे, अशीच आमची मागणी आहे. – मुझफ्फर हुसैन, माजी महापौर.

युती झाली तरी मेहतांचा प्रचार करणार नाही!

आज तुम्ही मोठे झालात म्हणून उतू-मातू नका. तुम्हाला जे चांगले दिवस आले आहेत ते शिवसेनाप्रमुखांमुळे आले आहेत हे कायम लक्षात ठेवा, असे नगरसेवकांनी ठणकावून सांगितले. वंदनीय शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला विरोध करण्याचे पाप नरेंद्र मेहता यांच्या इशार्‍यावरून झाले आहे. आता युती झाली तरी विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मेहतांचा प्रचार करणार नाही म्हणजे नाहीच, असा निर्धार शिवसेनेच्या नगरसेवकांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या