पाहा व्हिडीओ : गुटख्याची गाडी सोडण्यासाठी भाजप आमदाराची पोलिसाला दमदाटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गंगापूर

सॅल्यूट केला नाही म्हणून म्हणून पोलीस अधिकाऱ्याला धमकी देणारे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांचा आता एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत बंब हे त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीची गुटख्याची गाडी पकडली म्हणून गंगापूर शहरातील पोलीस उपनिरिक्षक गजेंद्र इंगळे यांना दमदाटी करताना दिसत आहेत. आमदाराचा फोन आला की पकडलेली कुठलीही गाडी सोडायलाच पाहिजे असा आदेशच ते इंगळे यांना देत दमदाटी करत आहेत.

गंगापूर शहरात नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी एक ट्रक पकडला होता. त्या ट्रकमध्ये गुटखा वाहून नेला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मात्र त्यानंतर गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी पोलीस उपनिरिक्षक गजेंद्र इंगळे यांना फोन करून त्या ट्रकला सोडून देण्यास सांगितले. मात्र इंगळे यांनी ट्रक सोडण्यास नकार दिला. जोपर्यंत वरिष्ठ सांगत नाही तोपर्यंत गाडी सोडणार नाही असे त्यांनी बंब यांना सांगितले. यावरून बंब हे वैतागले व त्यांनी इंगळे यांना गाठून त्यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. ‘लोकप्रतिनिधींनी सांगितलं गाडी सोडा तर गाडी सोडलीच पाहिजे. मला काही कारणं ऐकायची नाहीत. मी हे सिनिअर वैगरे ऐकणार नाही. एखाद्याने माफी मागितली तर सोडायला हवे पण तुम्ही तसे केले नाही. मी तुम्हाला फोन केला तरी तुम्ही मला कारणं देताय’ असे सांगत बंब यांनी इंगळेंवर आरडाओरडा केला. दरम्यान इंगळे यांनी स्पष्टीकरण देण्याचा देखील प्रयत्न केला मात्र त्यांनी इंगळेंचं काहीच ऐकलं नाही.

दरम्यान इंगळे यांनी त्यांनी केलेली कारवाई योग्य असल्याचे सांगितले आहे. ‘एखाद्या लोकप्रतिनिधीने अशाप्रकारे बेकायदेशीररित्या कुठलीही गाडी सोडण्यास आम्हाला सांगितले तर ते आम्ही ऐकणार नाही, आम्ही आमच्या साहेबांनी दिलेल्या ऑर्डरचे पालन करून या घटनेची नोंद स्टेशन डायरी मध्ये केलेली असून एसपी मॅडम व आय जी साहेबांना देखील यासंदर्भात कळविल्याचे इंगळे यांनी सांगितले.

या प्रकरणावर प्रशांत बंब यांनी प्रसिद्ध पत्रक जारी करून आपली बाजू मांडली आहे. प्रसारमाध्यमांनी व्हिडीओशी छेडछाड करून आपली बदनामी केल्याचं बंब यांनी या पत्रकात म्हटलं आहे. शहरातील गैरव्यवहार हे इंगळे यांना माहीत असूनही ते कारवाई करत नाहीत. त्यासंबंधीच्या चर्चेचा हा व्हिडीओ असून तो मध्येच कापून व्हायरल करण्यात आल्याचं स्पष्टीकरण बंब यांनी दिलं आहे.