मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची खुर्ची धोक्यात; लवकरच नेतृत्व बदलाचा भाजप आमदाराचा दावा

कर्नाटक भाजपमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आल्याने मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची खुर्ची धोक्यात आली आहे. उत्तर कर्नाटकमधील आमदारांनी येडियुरप्पा यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. लवकरच राज्यातील नेतृत्वात बदल करण्यात येणार असल्याचा दावा भाजप आमदार बसंगौडा पी. यतनाल यांनी केला आहे.

राज्यातील बहुसंख्य वरिष्ठ नेते येडियुरप्पा यांच्यावर नाराज आहेत, त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री बदलण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पुढील मुख्यमंत्री उत्तर कर्नाटकातील असेल, असे सांगितले आहे. उत्तर कर्नाटकातील जनतेने 100 आमदार दिले, ज्यांनी त्यांना मुख्यमंत्री बनवले, असे सांगत बसंगौडा यांनी पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात केलेल्या या गौप्यस्फोटामुळे कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सहा महिन्यांपूर्वी 20 आमदारांनी केले होते बंड
कुमारस्वामी यांचं सरकार कोसळल्यानंतर बी. एस. येडियुरप्पा कर्नाटकचे मुख्यमंत्री झालेत. सहा महिन्यांपूर्वी येडियुरप्पा यांच्या विरोधात 20 आमदारांनी बंड पुकारले होते. नाराज असलेल्या आमदारांनी उमेश कत्ती यांना कॅबिनेट मंत्री बनविण्याची मागणी केली होती. याशिवाय उमेश कत्ती यांचे भाऊ रमेश कत्ती यांना राज्यसभेवर पाठविण्यात यावे, अशी मागणी या बंडखोर आमदारांनी केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या