
सोलापूर बराच काळ प्रलंबित असलेल्या महानगरपालिका निवडणुकीवर डोळा ठेवून अनेकांनी तयारी केली, मात्र जोर पणाला लावूनही तिकीट काही मिळाले नाही. अखेर बंडखोरी केली. सोलापुरात भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या आत्यानेच बंडखोरी केली. त्यामुळे आमदारांना बंड थंड करण्यासाठी आत्याची मनधरणी करावी लागली.
भाजपने आमदार, खासदारांच्या घरात उमेदवारी देणार नसल्याचे धोरण राबविले, मात्र पक्षाचे धोरण अनेक ठिकाणी नेत्यांनी मोडून काढले. सोलापुरात आमदार कोठे याची आत्या कुमुद अंकाराम यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांनी प्रभाग 3 मधून शिंदे गटाकडून भाजपविरोधात उमेदवारी अर्ज भरला. आमदाराच्याच आत्याने बंडखोरी केल्यामुळे सोलापुरात चर्चेला ऊत आले होते. त्यामुळे कोठे यांच्यासमोर आत्याचे बंड शमविण्याची वेळ आली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कोठे यांनी आत्याची मनधरणी केली आणि अखेर आत्याने उमेदवारी मागे घेतली.





























































